Thu, Jun 04, 2020 22:36होमपेज › Marathwada › लातूर जिल्ह्यात २९ टँकर्सने पाणीपुरवठा

लातूर जिल्ह्यात २९ टँकर्सने पाणीपुरवठा

Published On: Apr 12 2019 2:06AM | Last Updated: Apr 12 2019 1:30AM
लातूर : प्रतिनिधी 

शहर व जिल्ह्यात पाणीटंचाई तीव्र झाली असून ग्रामीण भाग अधिक होरपळत असल्याने गावकर्‍यांचे हाल होत आहेत. जिल्ह्यातील गावांना 29 टँकर्सने पाणीपुरवठा केला जात असून लोकसंख्येच्या तुलनेत तो अपुरा असल्याने पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली आहे.

गतवर्षी अपेक्षित पाऊस न झाल्याने जलस्रोत तहानलेले आहेत. लातूर शहराला आठवड्यातून एक वेळ पाणी मिळत आहे. अनेक भागात अपेक्षित पाणीपुरवठा होत नसल्याने विकतचे पाणी घेण्याची वेळ शहरवासीयांवर आली आहे. ग्रामीण भागातील परिस्थिती गंभीर आहे. जिल्ह्यातील 69 गावांनी टँकरची मागणी केली असून केवळ एकोणतीस गावांना ते पुरवण्यात आले आहेत. सर्वाधिक 14 टँकर्स लातूर तालुक्यात असून त्या खालोखाल उदगीर तालुक्यात सात टँकर्सने  पाणीपुरवठा सुरू आहे. जळकोट तालुक्यात चार तर देवणी तालुक्यात दोन टँकर सुरू आहेत. रेणापूर व निलंगा तालुक्यात प्रत्येकी एक टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे.   टँकर येताच पाणी भरण्यासाठी मोठी गर्दी उसळत आहे. पाण्यावरून वाद होण्याच्या घटना घडत आहेत. 731 गावांनी जलस्रोतांच्या अधिग्रहणाची मागणी केली असून 423 गावांची मागणी प्रशासकीय स्तरावर मंजूर करण्यात आली आहे.

तांड्यावरच्या गावकर्‍यांचे हाल अधिक असून त्यांना पाण्यासाठी रणरणते ऊन अंगावर घेऊन भटकावे लागत आहे. गुरांच्या चारा-पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. ज्वारीचे माफक उत्पादन न निघाल्याने कडबा उत्पादनात घट आली आहे. त्यामुळे गुरांच्या चार्‍याचा प्रश्न बिकट झाला आहे. महागडी वैरण घेण्याचे आर्थिक बळ शेतकर्‍यांत नसल्याने ते हतबल होऊन पडत्या भावात गुरांची विक्री करत आहेत. लाखांच्या बैलजोडीचा भाव निम्म्यावर आला आहे. भाकड जनावरांना कसायाशिवाय ग्राहक राहिला नाही. गगनाला भिडलेल्या भावात चारा खरेदी करणे शक्य नसल्याने बैल बारदाना मोडून ठेक्याने अथवा बटईने शेती करण्याकडे अनेक शेतकरी वळले आहेत. साल गड्याच्या पगारी लाखाच्या पुढे सरकल्यानेही अनेक शेतकर्‍यांनी नाइलाजाने  बटाईने शेती करण्याचा निर्णय घेतला आहे.

तापमानाचा पारा वाढता राहत असल्याने  बाष्पीभवनाचा वेग वाढला आहे. उन्हामुळे दुभत्या गुरांचे दूध घटले आहे. पाण्याच्या शोधात रणरणते ऊन अंगावर घेऊन गुरा-माणसांना भटकंती करावी लागत असल्याने त्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. पाणी नसल्याने बरेच शेतकरी उसावर नांगर फिरवत असून मोठ्या प्रमाणात ऊस क्षेत्रात घट येणार आहे.