Fri, May 29, 2020 10:32होमपेज › Marathwada › प्रश्न कायम राहिल्याने निवडणुकीपासून मतदार दूर? 

प्रश्न कायम राहिल्याने निवडणुकीपासून मतदार दूर? 

Last Updated: Oct 20 2019 10:15AM
नेकनुर : मनोज गव्हाणे 

ग्रामीण भागात आजही मूलभूत प्रश्न कायम आहेत. यामुळेच की काय निवडणुकीच्या या वातावरणात मतदार निवडणूक काही तासावर आली असताना अलिप्त राहल्याचे चित्र प्रकर्षाने जाणवते आहे. नेकनुरच्या आठवडी बाजारात राष्ट्रवादीने आयोजित केलेल्या सभेकडे मतदारांनी पाठ दाखवून चर्चेला तोंड फोडले होते. 

या रविवारी दोन दिवसांपासून सुरू असलेला पाऊस, सकाळीच आभाळासोबत दाटलेले धुके आणि काही तासावर आलेल मतदान यापेक्षा सर्वांना काळजी होती ती पोटाची. म्हणूनच अनेकाच्या तोंडातून निवडणुकीतून आम्हाला काय मिळणार भाऊ? हा प्रश्न बाहेर पडला.

निवडणुकीचे पडघम वाजल्यानंतर ग्रामीण भागात वेगळेच वातावरण पाहायला मिळायचे. दोन-दोन महिने वातावरण तापलेले असायचे काळासोबत आता निवडणूक ही औटघटकेचा खेळ बनल्याने आणि यातून पुढे प्रश्न सुटतील याची शाश्वती नसल्याने मतदारही आता पूर्वीसारखे या खेळात रस दाखवत नसल्याचे पाहायला मिळत आहे. ही परिस्थिती केज विधानसभा मतदार संघात अनुभवायला मिळाली. 

नेकनुरचा मोठा आठवडी बाजार असल्याने गत आठवड्यात रविवारी येथे राष्ट्रवादीने सभा आयोजित केली, मात्र या सभेकडे लोकांनी पाठ दाखवल्याने पुन्हा येथे सभा घेण्याचे धारिष्ट्य कुठल्याच पक्षाने केले नाही. नेकनुरमध्ये पूर्वी शरद पवार, स्वर्गीय आर. आर. पाटील, विलासराव देशमुख, गोपीनाथ मुंडे आदी नेत्यांच्या सभा प्रमुख्याने होत् असायच्या यावेळी एक सभा झाली आणि तिचा फज्जा उडाला हे नेमके कशाचे धोतक आहे? रस्ते, पाणी, वीज या मूलभूत प्रश्नांना अजूनही न्याय मिळाला नसल्याने या मतदारसंघात विकासापेक्षा पक्षांतर, सहानुभूती यावरच निवडणूक केंद्रित राहिली. यामुळेच  काही तासांवर मतदान आले असतानाही मतदारांचा  निरुत्साह कायम आहे. मराठवाड्यात नव्हे राज्यात नेकनूरच्या आठवडी बाजाराला जनावरांच्या बाजाराने ओळख दिली, मात्र या बाजारातील समस्या कित्येक वर्षापासून आहे तशाच आहेत. मतदार संघात यापेक्षा काही वेगळे चित्र नाही. शुक्रवार, शनिवार  पडलेला पाऊस आणि रविवारी आभाळा सोबत दाटलेलं धुकं पोटासाठी मात्र यावर मात करीत सकाळीच चिखल तुडवत व्यवसाय थाटायला भाग पाडत होतं.