Sat, Jun 06, 2020 22:34होमपेज › Marathwada › कुलगुरूंचीच डिग्री हरवते तेव्हा!

कुलगुरूंचीच डिग्री हरवते तेव्हा!

Published On: Feb 10 2018 9:24AM | Last Updated: Feb 10 2018 9:24AMकुलगुरू चोपडे यांना 1974 साली कराड कॉलेज येथून ‘प्री-डिग्री सायन्स’ची पदवी मिळाली होती. ही पदवी 22 जानेवारी 2018 रोजी विद्यापीठ परिसरात कोठे तरी गहाळ झाली. ही बाब लक्षात आल्यानंतर कुलगुरूंनी आपल्या डिग्रीचा शोध घेतला; परंतु ती सापडली नाही. शेवटी त्यांनी 30 जानेवारी रोजी आपली डिग्री हरवल्याची रीतसर तक्रार बेगमपुरा पोलिस ठाण्यात नोंदविली. आपल्याकडे कुलगुरूंची डिग्री हरवल्याबाबतची तक्रार आली होती. शुक्रवारी कुलगुरूंच्या घरीच डिग्री सापडल्याचे बेगमपुरा पोलिसांनी सांगितले.

औरंगाबाद : प्रतिनिधी

आपण कितीही जपले तरी एकदा का होईना शैक्षणिक कागद हरवतोच. कुणाची टीसी हरवते, कुणाचा मार्क मेमो हरवतो, तर कुणाची सगळी कागदपत्रे हरवतात. बहुतांश जणांसोबत हे घडतेच. मात्र, एकदा हरवलेल्या या कागदपत्रांची पुन्हा प्रत काढण्याची प्रक्रिया कशी किचकट आणि त्रासदायक असते, याचा अनुभव सध्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांना येत आहे.

कारण खुद्द कुलगुरूंचीच ‘प्री- डिग्री सायन्स’ची पदवी हरवली आहे. त्याची प्रत काढण्यासाठी आता कुलगुरूंना बेगमपुरा ठाण्यात ‘मिसिंग’ची तक्रार नोंदवावी लागली. पूर्वी कोणतेही शैक्षणिक कागदपत्र हरवले की, त्याची प्रत मिळावी म्हणून बाँडपेपरवर शपथपत्र करून एक अर्ज केला की आपल्याला त्या कागदपत्राची डुप्लिकेट प्रत शाळा, महाविद्यालय, बोर्ड वा संबंधित विद्यापीठातून मिळत असे. मात्र, या डुप्लिकेट प्रतीचा गैरवापर होऊ लागला.

त्यामुळे काही वर्षांपूर्वी हे नियम कडक करण्यात आले. आता टीसी, डिग्रीसारखे कागदपत्र हरवले की त्याची वृत्तपत्रात जाहिरात देणे, आपले कागदपत्र हरवल्याची तक्रार पोलिस ठाण्यात नोंद करणे अनिवार्य करण्यात आले आहे. तक्रार आणि जाहिरात दिल्यानंतर या दोन्हींची प्रत, तसेच बाँडपेपरवर शपथपत्र बनवून, ते हरवलेले डुप्लिकेट कागदपत्र मिळावे अशा आशयाच्या अर्जासोबत जोडून, तो अर्ज सादर करावा लागतो.

त्यासाठी काही फीसही भरावी लागते. त्यानंतर आपल्याला ‘त्या’ हरवलेल्या कागदपत्राची डुप्लिकेट प्रत मिळते. अशा या किचकट प्रक्रियेचा सध्या कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे अनुभव घेत आहेत.