Fri, May 29, 2020 10:17होमपेज › Marathwada › उमरखेड : कुरळी येथील ३४० कुटुंबांचा मतदानांवर बहिष्कार

उमरखेड : ३४० कुटुंबांचा मतदानांवर बहिष्कार

Last Updated: Oct 17 2019 12:38PM

संग्रहित छायाचित्रउमरखेड : प्रतिनिधी 

तालुक्यातील कुरळी येथील जवळपास 340 कुटुंबातील एकविसशे मतदारांनी होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या मतदानावर पुनर्वसनाचा मोबदला व पुनर्वसन झाल्याशिवाय मतदान करणार नसल्याचे गावकऱ्यांनी ठामपणे ठरविले आहे. 

मिळालेली माहिती अशी की, तालुक्यातील अमडापूर धरणाची निर्मिती सन 1994 मध्ये झाली. या धरणामध्ये कुरळी, भोजनगर, घमापूर या गावातील जवळपास सतराशे हेक्टर जमीन बाधित झाली. कुरळी येथील 200 कुटुंबांचा उदरनिर्वाह असलेली शेती या धरण निर्मितीकरिता देण्यात आली. विशेष म्हणजे सर्व जमीन सुपीक होती. सदर जमिनीचा न्यायालयातून काही प्रमाणात मोबदला मिळाला पण 2013 च्या जीआर नुसार, पुनर्वसनचा मोबदला मिळाला नाही. शासनाला आजपर्यंत गावाचे पुनर्वसन करण्याकरिता जागा मिळाली नाही, असे वेळोवेळी प्रशासनाकडून सांगण्यात येते.  तर मागील वर्षी पुनर्वसन करण्याकरिता महागाव येथे पाच हेक्टर जमीन जीएमआर करून मोबदला दिला. यामध्ये 170 घर महागाव व 170 घर कुरळी करिता राखीव करण्यात आले. पण जागा कमी पडत असल्या कारणामुळे शासनाने अद्याप जागा दिली नाही. हा लढा गेल्या 18 वर्षापासून निरंतर सुरू आहे. 

महसूल राज्यमंत्री जिल्हाधिकारी व अपर जिल्हाधिकारी यांच्या बैठका सुद्धा घेण्यात आल्या. यामध्ये पुनर्वसन प्रस्ताव मंजूर झाला. एवढेच नव्हे तर शासन दरबारी आमच्या समस्या कायमस्वरूपी रेंगाळत राहिल्याने आम्ही पुसद व यवतमाळ येथे मोर्चा आंदोलन उपोषण करून शासनाला आमची मागणी लावून धरली. त्यानंतर प्रशासनाने अधीक्षक अभियंता यांना चार दिवसात प्रस्ताव सादर करा असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. सदर प्रस्ताव अमरावती येथे मंजुरीकरिता पाठविण्यात आला. पण प्रस्ताव तपासण्याकरिता वेळ लागेल असे विभागीय कार्यालयाने कळविले. काही दिवसांपूर्वीच अमरावती येथून प्रस्ताव त्रुटी अभावी परत आला. सदर विषयावर प्रत्येकवेळी प्रशासनासोबत गावकऱ्यांच्या शिष्टमंडळाने बैठका बसवून विषय मार्गी लावणे सुरू आहे. पण अद्यापपर्यंत निर्णय लागलेला नाही, त्यामुळे होऊ घातलेल्या विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत मतदानाचा बहुमुल्य अधिकार जरी आम्हाला मिळाला असला तरी देखील आमच्या समस्या सुटत नसल्याने आम्ही या निवडणुकीत मतदानावर कुटुंबासहित सर्व गावकरी मंडळींनी ठराव घेऊन निवडणुकीवर बहिष्कार घालून मतदान न  करण्याचा संकल्प केला आहे, असे यावेळी गावकरी म्हणाले.

गावकर्‍यांसोबत चर्चा झाली आहे, लवकरच तोडगा निघेल 

कुरळी येथील ग्रामस्थांशी महागावचे तहसीलदार  यांचेद्वारे प्रशासकीय चर्चा झाली असून गावकऱ्यांनी सुद्धा सकारात्मक प्रतिसाद दिलेला आहे. गावकऱ्यांची मागणी रास्त असून शासन स्तरावर पाठपुरावा करून लवकरात -लवकर त्यांना न्याय देण्यात येईल, अशी प्रतिक्रिया निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी स्वप्निल कापडणीस यांनी   दिली.

स्वप्निल कापडणीस, निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी उमरखेड