Thu, Jun 04, 2020 22:51होमपेज › Marathwada › दुचाकीची समोरासमोर धडक, 1 ठार दोघे जखमी

दुचाकीची समोरासमोर धडक, 1 ठार दोघे जखमी

Published On: Dec 14 2018 1:47AM | Last Updated: Dec 13 2018 9:38PM
हिंगोली : प्रतिनिधी

दोन दुचाकीत झालेल्या समोरासमोरील धडकेत एक जण ठार तर दोघे जण गंभीर जखमी झाल्याची घटना गुरुवारी (दि.13) सकाळी साडे नऊच्या सुमारास हिंगोली तालुक्यातील फाळेगाव पाटीनजीक असलेल्या श्री कृष्ण मंदिराजवळ घडली. 

दुचाकीची समोरासमोर धडक झाल्यानंतर रस्त्यावर पडलेल्या एकाच्या अंगावरून ट्रक गेल्याने त्याचा चेंदामेंदा झाला. कनेरगाव येथील कयुम खाँ सलाम खाँ पठाण व नर्सी नायगाव येथील दत्‍तात्रय कुंडलीक लोहगावे हे सकाळी साडे नऊच्या सुमारास मोटार सायकल क्र.एमएच 38 एल 2400 वर बसून हिंगोलीकडे जात असतांना हिंगोलीहून कनेरगाव नाकाकडे जाणार्‍या केजे 14-51 एम 5960 या क्रमांकाच्या मोटारसायकलची धडक फाळेगाव जवळील श्री कृष्ण मंदिराजवळ झाली. या धडकेत मुरलीधर नारायण सैनी रा.जयपुर राजस्थान ह.मु.नर्सी नामदेव यांच्यासह कयुम खाँ सलाम खाँ पठाण जखमी झाले. तर दत्‍तात्रय कुंडलिक लोहगावे हे मोटारसायकलच्या धडकेत रस्त्यावर पडल्या नंतर त्यांच्या डोक्यावरून समोरून येणारा ट्रक गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. या अपघाताची माहिती मिळताच कनेरगाव नाका चौकीच्या पोलिसांनी अपघात स्थळी धाव घेतली. जखमींना हिंगोली येथील सामान्य रूग्णालयात उपचारासाठी पाठविण्यात आले. या प्रकरणी उशिरापर्यंत पोलिसात कोणत्याही प्रकारचा गुन्हा दाखल झाला नव्हता. 

अपघातामुळे अकोला-हिंगोली महामार्गावरील वाहतुक काही काळ ठप्प झाली होती. पोलिसांनी वाहतुक सुरळीत केली.