Mon, Jun 17, 2019 10:30होमपेज › Marathwada › भररस्त्यात दरोडेखोरांनी लुटले अडीच कोटी!

भररस्त्यात दरोडेखोरांनी लुटले अडीच कोटी!

Published On: Oct 12 2018 4:19PM | Last Updated: Oct 12 2018 5:59PMनंदुरबार : प्रतिनिधी 

इनोव्हा गाडीतून आलेल्या सहा जणांनी चाकू आणि रिव्हॉल्वरचा धाक दाखवून भररस्त्यात सुमारे २ कोटी ४१ लाख रुपयांची रक्कम लंपास केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. नवापूर पासून पाच किलोमीटर अंतरावर पिंपळनेरकडे जाणाऱ्या रस्त्यावर ही घटना घडली. याप्रकरणी नवापूर पोलिस ठाण्यात दरोड्याचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. हवालामार्गे दिली जाणारी ही रक्कम असल्याची माहिती समोर आली असून व्यापारी लोकांमध्ये यामुळे खळबळ उडाली आहे.

अधिक माहिती अशी की, चालक शैलेश कुमार द्वारका भाई पटेल  (रा. अल्थान पठार, सुमन अमृत सोसायटी, सुरत) हा हरीश पटेल आणि मेहुल पटेल या दोन साथीदारांसह सफारी कार एमएच 19 बीयू 9009 क्रमांकाच्या गाडीने  जळगाव येथून  अहमदाबादकडे जाण्यासाठी निघाला होता. यावेळी त्यांच्या गाडीत हवालामार्गे दिली जाणारी सुमारे दोन कोटी  ४१ लाख ५० हजार रुपयांची रोख होती. काल, ११ ऑक्टोबर रोजी  सकाळी साडेअकराच्या दरम्यान नवापूर पासून पाच किलोमीटर अंतरावर पिंपळनेरकडे जात असतानाच अचानक समोरून  डीजे ०५ सीएल २२४३ क्रमांकाची इनोव्हा गाडी आली. त्या गाडीतील सहा जणांनी उतरून चालक शैलेश कुमारसह तिघांना पिस्तुल आणि चाकूचा धाक दाखवून धमकावत त्यांच्याकडील २ कोटी ४१ लाख ५० हजार रुपयांची रक्कम लंपास केली. अचानक झालेल्या या घटनेमुळे घाबरलेल्या शैलेशने व त्याच्या साथीदारांनी सुरत येथील मालकाशी संपर्क केला. त्यांनी घटनेची माहिती दिली असता सुरत येथून प्रतिनिधी आल्यावर आज पहाटे साडेतीन वाजता नवापूर पोलिस ठाण्यात फिर्याद नोंदविण्यात आली 

हवालामार्गे रक्कम देण्याचा व्यवहार करणाऱ्या व्यापारी लोकांमध्ये यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. या घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलिस अधीक्षक संजय पाटील, अतिरिक्त अधीक्षक गवळी, उपविभागीय पोलिस अधिकारी रमेश पवार याच्यासह नवापूर पोलिस ठाण्यातील संबंधित अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. तर दरोडा घालणार्‍या आरोपींच्या शोधार्थ पथके रवाना करण्यात आली.