Sat, Aug 24, 2019 09:46होमपेज › Marathwada › साखरेच्या पोत्याखाली दबून पती पत्नीसह दोन मुलांचा मृत्यू 

साखरेच्या पोत्याखाली दबून पती पत्नीसह दोन मुलांचा मृत्यू 

Published On: Nov 08 2018 5:33PM | Last Updated: Nov 08 2018 5:33PMमाजलगाव : प्रतिनिधी    

देवदर्शन करून घरी जात असतानाच छत्रपती कारखान्यातून साखऱ्याची पोती घेऊन जाणारा ट्रक वाटेत पलटी झाल्याने साखऱ्याच्या पोत्याखाली दबून झालेल्या अपघातात एकाच कुटुंबातील चौघांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना आज, गुरुवार दुपारच्या सुमारास शहरापासून ३ किलोमीटर राष्ट्रीय महामार्गावरील एच.पी. गोडावून जवळ घडली.  या अपघातातील मृत्यूची नावे दयानंद गणेश सोळंके (वय ४०), संगीता दयानंद सोळंके (वय ३६), राजनंदनी दयानंद सोळंके (वय ७), पृथ्वीराज दयानंद सोळंके (वय ५) अशी आहेत. 

याबाबत अधिक माहिती अशी की, दयानंद सोळंके हे आपल्या कुटुंबासोबत माजलगाव शहरात राहत होते. पाडव्यानिमित्त ते गंगामसला येथील मोरेश्वराचे दर्शन घेऊन त्यांच्या नातेवाईकांसह मोटारसायकलवरून माजलगावकडे परत येत होते. शहरापासून ३ किलोमीटर अंतरावर एच.पी. गॅस गोडवून जवळ आले असता समोरून साखऱ्याची पोते घेऊन येणारा ट्रक विरुद्ध दिशेने त्यांच्या गाडीजवळ येऊन पलटी झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

ट्रकचा चालक दारूच्या नशेत गाडी चालवीत असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. दयानंद हे जांबसमर्थ येथे एका खाजगी बँकेत नोकरीला होते. ते दिवाळीच्या सणानिमित्त गावाकडे आले होते. पाडव्यानिमित्त ते त्याच्या गावी श्री. मोरेश्वराचे दर्शन घेऊन परत माजलगावला येत असताना काळाने त्यांच्यावर घाला घातला. या दुर्दैवी घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.