Sat, Jun 06, 2020 15:09होमपेज › Marathwada › स्‍वत:ची चिता रचून आत्मदहनाचा प्रयत्न

स्‍वत:ची चिता रचून आत्मदहनाचा प्रयत्न

Published On: Dec 10 2018 6:30PM | Last Updated: Dec 10 2018 6:30PM
अहमदपूर (जि. लातूर) : प्रतिनिधी

बनावट कागदपत्राआधारे स्वतःच्या मालकीच्या जागेवर अतिक्रमण केलेल्या व्यक्ती विरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल केला जात नसल्याने व्यथित झालेल्या एका नागरिकाने स्‍वत:च चिता रचून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. अहमदपूर तहसील कार्यालया समोर सोमवारी ही घटना घडली. बलभीम कासले असे आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्याचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, उजना येथील बलभीम यांच्या मालकीच्या जागेवर त्यांच्या गावातील एका व्यक्तीने  अतिक्रमन करून पक्के घर बांधले आहे. संबंधित व्यक्ती व ग्रामसेवक यांनी संगनमताने बनावट कागदपत्रांच्या आधारे  मूळ दस्ता ऐवजास बनावट कागदपत्रे जोडून फेरफार केल्याची तक्रार बलभीम व त्यांच्या पत्नी सुरेखा यांनी अहमदपूर गटविकास अधिकाऱ्यांकडे २७  नोव्हेंबर रोजी केली होती. ८ डिसेंबरपर्यंत यावर निर्णय न झाल्यास अमरण उपोषनास बसण्याचा इशाराही त्यांनी दिला होता. मुदत संपली तरी  त्यावर कारवाई न झाल्याने ते सपत्नीक उपोषणास बसले होते. 

प्रशासनाने त्यांच्या उपोषणाची दखल घेतली नाही. प्रशासनाच्या या भूमिकेमुळे व चौकशी प्रलंबित ठेवल्यामुळे बलभीम यांनी व्यथित होऊन अहमदपूर तहसील कार्यालया समोर स्वतःची चिता रचली. त्यावर पांढरा कपडा टाकून ते चितेवर आडवे झाले. यामुळे तिथे एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती कळताच अहमदपूरच्या उपविभागीय पोलिस अधिकारी अश्विनी शेलार  त्यांच्या सहकाऱ्यांसह  घटनास्थळी दाखल झाल्या. त्यामुळे अनर्थ टळला. शेलार यांनी  बलभीम यांची समजूत काढली. 

दरम्यान, या प्रकरणात ग्रामसेवक व विस्तार अधिकारी  यांना जबाबदार धरून त्यांची तात्पुरती वेतन वाढ रोखण्यात आल्याचे अहमदपूरचे गट विकास अधिकारी शिवाजी यमुलवाड यांनी सांगितले.