Sat, Jul 04, 2020 20:02होमपेज › Marathwada › जालना : संशयास्पद बॅग म्हणून रेल्वेतून फेकली, अन्...

संशयास्पद बॅग म्हणून रेल्वेतून फेकली, अन्...

Last Updated: Nov 11 2019 1:33AM

संग्रहित छायाचित्रजालना : प्रतिनिधी 

अजिंठा एक्स्प्रेसमधून जालना रेल्वे स्थानकात फेकलेली बेवारस बॅग कदिम जालना पोलिसांनी प्रवाशाचा शोध घेऊन प्रामाणिकपणे परत केली. ही बॅग परभणी येथील एका विद्यार्थ्याची होती. त्यामध्ये रोख ५ हजार रूपये होते. कदीम जालना पोलिसांच्या या प्रामाणिकपणाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

नांदेडहून औरंगाबादकडे जाणाऱ्या अजिंठा एक्स्प्रेसमधून अज्ञात व्यक्तीने एक बॅग जालना रेल्वे स्थानकात फेकली होती. या बॅगेत काहीतरी घातक वस्तू असण्याच्या भीतीने कोणीही तिला हात लावायला तयार नव्हते. तेवढ्यात रेल्वे स्थानकातून कदीम जालना पोलिसांना फोन गेल्याने पोलिस जमादार श्यामराव वाहूळे यांनी पोलिस कर्मचारी दिनेश चौरे, जोंधळे, होमगार्ड कराळे व राज्य राखीव दलाच्या जवानांना सोबत घेऊन त्यांनी तातडीने रेल्वे स्थानक गाठले. यावेळी पोलिसांनी या बॅगची शहानिशा करून, त्यामध्ये असलेल्या वस्तूची तपासणी केली. यावेळी बॅगमध्ये रोख ५ हजार रुपये आणि बँकिंग परीक्षेचे सोडवलेले पेपर आढळून आले. तसेच, त्यामध्ये असलेल्या एका रजिस्टरमध्ये असलेल्या नाव व त्यावरील मोबाईल क्रमांकावर वाहूळे यांनी फोन लावला असता, ही बॅग परभणी येथील बँकिंग भरतीच्या पूर्वपरीक्षेची तयारी करणाऱ्या गोविंद पांचाळ या विद्यार्थ्यांची असल्याची खात्री पटली. 

परभणी येथील गोविंद पांचाळ (वय २२) हा सकाळी औरंगाबादला जाण्यासाठी तो परभणी येथे अजिंठा एक्स्प्रेसमध्ये बॅग सीटवर ठेवून तिकीट काढण्यासाठी गेला होता. तिकीट काढून येईपर्यंत ही रेल्वे निघून गेली होती, असे त्याने सांगितले. दरम्यान, त्याची ही बेवारस बॅग जालना स्थानक आल्यानंतर कोणीतरी फेकून दिली होती. पोलिस कर्मचारी वाहूळे यांनी गोविंद पांचाळ याला जालन्यात बोलावून त्याची बॅग सन्मानपूर्वक परत केली. एका विद्यार्थ्यासाठी ५ हजार रुपये आणि बँकिंग परीक्षा तयारीचे पेपर ही बाब मोठी असल्याने, गोविंद याने पोलिसांचे आभार मानले.