Fri, Jun 05, 2020 22:26होमपेज › Marathwada › बीडमध्ये एकाच कुटुंबातील तिघाची आत्महत्या

बीडमध्ये एकाच कुटुंबातील तिघाची आत्महत्या

Published On: Nov 09 2018 1:18PM | Last Updated: Nov 10 2018 1:13AMबीड : पुढारी ऑनलाईन 

शहरातील संत नामदेव नगर भागात राहणाऱ्या एकाच कुटुंबातील तिघांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घटना शुक्रवारी सकाळी समोर आली. शहरापासून जवळच ही घटना घडली असून मृत कुटुंबीयांचे आडनाव शिंदे असल्याचे सांगण्यात येते. ऐन दिवाळीत घडलेल्या या घटनेने शहरात चांगलीच खळबळ उडाली आहे. आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेली सुसाईड नोट पोलीसांना मिळाली असून त्या अनुषंगाने तपास सुरू झाला आहे. गणेश सूर्यभान शिंदे (वय ३२), शीतल शिंदे (वय २८) व श्रावणी (वय ०५) अशी मयतांची नावे आहेत. 

पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, गणेश शिंदे हा खाजगी वाहन चालक होता. मागील काही दिवसापासून शिंदे हे तानावाखाली होते. दरम्यान, शुक्रवारी सकाळी गणेश शिंदे यांचे प्रेत घरासमोरील झाडाला तर त्यांची पत्नी शीतल व मुलगी श्रावणी हे मयत अवस्थेत घरात आढळुन आले. या घटनेची माहिती शेजाऱ्यांनी पोलिसांना कळवली. अपर पोलिस अधीक्षक वैभव कलुबर्मे, डीवायएसपी सुधीर खिरडकर, पोलिस निरीक्षक घनश्याम पालवदे, पोलिस निरीक्षक एस. के. पूरभे यांनी भेट दिली. 
गणेश शिंदे याने पत्नी व मुलीस विष पाजून नंतर स्वतः आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. 

या संदर्भात पोलिस निरीक्षक पूरभे म्हणाले की, मयत व्यक्तिच्या खिशात एक चिठ्ठी सापडली असून एका व्यक्तिमुळे त्रास झाल्याने आत्महत्या करत असल्याचा उल्लेख आहे. त्या दृष्टीने तपस सुरू आहे. शवविच्छेदनासाठी शव जिल्हा रुग्णालयात आणले आहेत. शवविच्छेदनानंतरच इतर बाबीही समोर येऊ शकतील.