Sun, Jun 07, 2020 15:04होमपेज › Marathwada › हजारो घरातला अंधार होणार दूर 

हजारो घरातला अंधार होणार दूर 

Published On: Apr 18 2018 12:50AM | Last Updated: Apr 17 2018 10:33PMअंबाजोगाई : रवी मठपती 

केंद्र सरकारच्या सौभाग्य योजनेमुळेे हजारो घरातला अंधार दूर होणार आहे. आर्थिक परिस्थितीने कमकुवत असलेल्या कुटुंबात सत्तर वर्षांच्या स्वातंत्र्यानंतरही विद्युत प्रकाश पोहोचला नाही. अशा कुटुंबांसाठी केंद्र शासनाने सौभाग्य योजना राबविण्याचा निर्णय घेतला आहे. सौभाग्य योजनेचा लाभ बीपीएल व एपीएल लाभार्थ्यांना होणार आहे. या योजनेची अंमलबजावणी 14 एप्रिल पासून सुरू करण्यात आली आहे. योजना प्रभावीपणे राबविण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. या योजनेमध्ये दारिद्र्य रेषेखाली असलेल्या कुटुंबीयास मोफत जोडणी देण्यात येणार आहे. दारिद्र्य रेषेखाली घरांसाठी वीज जोडणी, एमएसईबी आणि एक बल्ब मोफत देण्यात येणार आहे. दारिद्र्य रेषेखालील अर्जदारास वीज जोडणीसाठी कुठलेही शुल्क आकारण्यात येणार नाही. एपीएल यादीत समाविष्ट असलेल्या लाभार्थ्यांना 500 रुपये भरावे लागणार आहेत, परंतु ही रक्कम वीज जोडणी वेळी भरावयाची आवश्यकता नाही. प्रत्येक महिन्याच्या वीज बिलात 50 रुपयांप्रमाणे ही रक्कम परतफेड करावयाची आहे. त्यामुळे वीज जोडणीसाठी आर्थिक ताण निर्माण होणार नाही.  

योजनेचा लाभ घेण्यासाठी संबंधितांनी महावितरणच्या कार्यालयास संपर्क साधावयाचा आहे. मागणी अर्ज करताना सोबत स्वतःचे ओळखपत्र, आधार कार्ड, एपीएल अथवा बीपीएल असल्याचे कार्ड जोडायचे आहे. विद्युत जोडणीसाठी अर्ज करताना संबंधित अर्जदाराकडे महावितरणची कुठलीही थकबाकी असता कामा नये हे विशेष. महावितरणच्या वतीने गावागावात एपीएल व बीपीएल याद्या अद्यावत करण्यासाठी पुढाकार घेण्यात येणार आहे.सध्या अंबाजोगाई महावितरण कार्यालयाच्यावतीने दारिद्य्र रेषेखालील कुटुंबीयांसाठी मागणी अर्ज केल्याबरोबर तत्काळ वीज जोडणी देत असल्याची माहिती मिळाली. तसेच एपीएल कुटुंबीयांसाठी आठ ते दहा दिवस वीज जोडणी देण्यासाठी वेळ लागणार आहे. 

Tags : Marathwada, Thousands, households, darkness