Sun, May 31, 2020 03:14होमपेज › Marathwada › आरक्षणाच्या मागणीसाठी तरूणाने घेतली जलसमाधी (video)

आरक्षणाच्या मागणीसाठी तरूणाने घेतली जलसमाधी (video)

Published On: Mar 05 2019 5:28PM | Last Updated: Mar 05 2019 5:33PM
बीड : प्रतिनिधी 

मातंग समाजाला वेगळे आरक्षण देण्याची मागणी करत एका तरुणाने जलसमाधी घेतल्याची खळबळजनक घटना समोर आली. बीडजवळील पाली तलावात या तरूणाने जलसमाधी घेतली. संजय ज्ञानोबा ताकतोडे (वय ३४, रा. साळेगाव, ता.केज) असे मृत तरुणाचे नाव आहे. आज, मंगळवारी सकाळच्या सुमारास ही घटना घडली. जलसमाधी घेताना या तरूणाने सत्तारुढ फडणवीस सरकारच्या विरोधात व्हिडीओ तयार केला आहे. 

संजय हा सकाळी बीडजवळील पाली येथील तलावावर आला. धरणाच्या भिंतीवर उभा राहून, त्याने एक व्हिडीओ बनवला. या व्हिडिओमध्ये त्याने मातंग समाजाला तेरा टक्के आरक्षणातून वेगळे आरक्षण देण्याची मागणी केली. तर या मागणीकडे दुर्लक्ष करणा-या मुख्यमंत्री फडणवीस सरकारवर त्याने टीका देखील केली. फडणवीस सरकारला जागे करण्यासाठी आपण जलसमाधी घेत असल्याचे त्याने या व्हिडीओमध्ये म्हटले आहे. 

पाली तलावात तरुणाने जलसमाधी घेतल्याची माहिती मिळताच बीड गाम्रीण पोलिस ठाण्याचे सपोनि.बल्लाळ व त्यांच्या सहकार्यानी घटनास्थळी धाव घेतली. अग्निशामक दलाच्या जवानानी या तरूणाचे प्रेत बाहेर काढले. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला. मात्र संजयचा हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर दलित चळवळीच्या कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केला.