Thu, Jun 04, 2020 23:17होमपेज › Marathwada › 89 लाख रोपे निर्मितीचे काम प्रगतिपथावर

89 लाख रोपे निर्मितीचे काम प्रगतिपथावर

Published On: May 16 2018 1:38AM | Last Updated: May 16 2018 1:38AMपरभणी : बालासाहेब काळे

महाराष्ट्र शासनाच्या 13 कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमांतर्गत परभणी जिल्ह्यासाठी 34 लाख 16 हजार रोपांची लागवड करण्याचे उद्दिष्ट निश्‍चित करण्यात आले आहे. त्यासाठी सर्व शासकीय यंत्रणांना रोपे पुरविण्याची जबाबदारी वनविभाग व सामाजिक वनीकरण विभागाने स्वीकारली आहे. यावर्षीची लागवड व पुढील वर्षासाठी अशा एकूण 89 लाख रोपांची निर्मिती करण्याचे काम सध्या प्रगतिपथावर आहे. 

वनविभाग 8 लाख, सामाजिक वनीकरण विभाग 6 लाख रोपे लावणार आहे.  शासनाच्या इतर विभागांसह स्वयंसेवी संस्था तसेच जनतेच्या सहभागातून यंदाच्या पावसाळ्यात 34 लाख 16 हजार रोपे लावण्यात येणार आहेत. त्यासाठी लागणारी रोपे तयार करण्याचे काम सुरू आहे. वनविभागाच्या 27 आणि सामाजिक वनीकरणच्या 25 अशा एकूण 47 रोपवाटिका जिल्ह्यात कार्यरत आहेत. यावर्षी पावसाळ्यात लागवडीसाठी साधारणतः 3 ते 4 फूट उंचीची 35 लाख रोपे तयार होतील, अशी माहिती विभागीय वनअधिकारी व्ही.एन. सातपुते यांनी दिली आहे. लवकरच रोपवाटिकांमध्ये उपलब्ध असलेल्या जातवार रोपांबाबतची पुस्तिका तयार करण्यात येणार आहे. 13 कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमासाठी सर्व विभागाने पुढाकार घेतला असून, त्यांनी तालुकास्तरावर आपापल्या विभागाचे समन्वयक अधिकारी नेमले आहेत. नुकतीच समन्वयक अधिकारी पुस्तिकाही प्रकाशित करण्यात आली आहे.

नागरिकांना काही अडचण असेल तर त्यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन वन विभागाकडून करण्यात आले आहे. वनविभागात सध्या कर्मचारी वर्ग अपुरा असून त्यांच्याकडून जास्त काम करून घेण्याची कसरत केली जात आहे. तरीही उपलब्ध कर्मचारी व मनुष्य बळाआधारे जिल्ह्याचे 34 लाख 16 हजार रोपे लागवडीचे उद्दिष्ट पूर्ण करू, असा विश्‍वास अधिकारी व्यक्त करीत आहेत.