Fri, May 29, 2020 02:45होमपेज › Marathwada › रेल्वेगाड्यांतील स्वच्छतेचा प्रश्‍न गंभीर

रेल्वेगाड्यांतील स्वच्छतेचा प्रश्‍न गंभीर

Published On: Jul 21 2018 1:31AM | Last Updated: Jul 20 2018 10:54PMपूर्णा : मुजीब खुरेशी

मराठवाड्यातील निजामकालीन दक्षिणमध्ये रेल्वेचे मोठे जंक्शन असलेल्या पूर्णा स्थानकावरून देशातील मोठ्या शहरांकडे अनेक गाड्या ये- जा करत असल्याने नेहमी  स्थानकावर प्रवाशांची वर्दळ असते. त्यामुळे प्रशासन या प्रवाशांना  सोयी-सुविधा पुरवण्यासाठी प्रयत्नशील असते, परंतु रेल्वेच्या डब्यांमध्ये अस्वच्छता वाढली आहे. शिवाय स्थानकावर रेल्वे पोलिसांची संख्या कमी असल्याने प्रवाशांचा सुरक्षिततेचा प्रश्न नेहमी निर्माण होताना दिसत आहे.

एकेकाळी पूर्णा शहराचे वैभव या रेल्वेच्या जंक्शनमुळे टिकून होते. सर्व व्यापारपेठ यावर चालत असे, परंतु लोकप्रतिनिधींच्या उदासीनतेमुळे सर्व कार्यालये नांदेड येथे हलविण्यात आले. सध्या मोजके कार्यालय व  कर्मचारी येथे उरले आहेत. पूर्णा रेल्वे स्थानकावर 1 ते 4 रेल्वे फलाट आहेत. रेल्वेची अंदाजे शंभर-दीडशे एकर जमीन आहे. या रेल्वेच्या मालमतेच्या सुरक्षिततेसाठी रेल्वे फलाट 1 वर रेल्वे सुरक्षा बलाचे कार्यालय आहे. तसेच चालक व गार्ड साठी क्रु- बुकींग लॉबीच्या कार्यालयासह प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी मात्र बोटावर मोजण्याइतकेच रेल्वे पोलिस असून एका पोलिस ठाण्यालाच चौकीचे स्वरूप देण्यात आले आहे. 

पूर्णा येथून अकोला,  हैद्राबाद,  बंगलोर, मुंबई, अमृतसरसह आदी लांब पल्ल्याच्या गाड्या ये- जा करतात. त्यामुळे सतत प्रवाशांची वर्दळ असते. यामुळे रेल्वे स्थानक परिसरात भुरट्या चोर्‍यांचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे या चोरट्यांपासून प्रवाशांना सुरक्षित ठेवण्याकरिता पोलिस कर्मचारी कमी पडत आहे. त्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पूर्णा स्थानकावर गंभीर बनत चालला आहे. त्यामुळे नागपूर लोहमार्गच्या पोलिस अधीक्षक यांनी या प्रश्नानाकडे लक्ष देऊन  रेल्वेचौकीत कर्मचार्‍यांची संख्या वाढवून एक अधिकारी नियुक्त करण्याची मागणी पुढे येत आहे. त्याचबरोबर रेल्वेची इतकी मोठी जागा पूर्णा परिसरात असताना त्याचा उपयोग घेऊन रेल्वे प्रशासनाने एकदा मल्टिस्पेशालिटी दवाखाना किवा रेल्वेचे मिनी वर्कशॉप उभारण्याची मागणी होत आहे.