Sun, Jun 07, 2020 15:22होमपेज › Marathwada › गेवराई तालुक्यामध्ये दुष्काळाची छाया गडद

गेवराई तालुक्यामध्ये दुष्काळाची छाया गडद

Published On: Aug 10 2018 12:58AM | Last Updated: Aug 10 2018 12:28AMगेवराई : प्रतिनिधी

पावसाळा सुरू होऊन दोन महिने उलटले असताना अद्यापही नदी, नाले खळखळून वाहिले नाहीत. जूनमध्ये थोड्याफार प्रमाणात झालेल्या पावसावर शेतकर्‍यांनी खरिपाच्या पेरण्या केल्या. मात्र मागील महिनाभरापासून पावसाने ओढ दिली असून पाऊस गायब आहे. परिणामी पावसाअभावी पिकांनी माना टाकल्याचे चित्र आहे. पिण्याच्या पाण्याची समस्या कायम आहे, जनावरांच्या चार्‍याचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे ही वाटचाल पुन्हा दुष्काळाच्या दिशेने सुरू झाल्याचे चित्र असून गेवराई तालुक्यात दुष्काळाची छाया गडद बनतानाचे चित्र आहे.

पावसाच्या प्रतीक्षेत दिवसामागून दिवस जात आहेत, मात्र पाऊस काही पडत नसल्याने पिण्याच्या पाण्यासह शेतीपिकांचेही मोठे नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. बोंडअळीमुळे कपाशीवर नांगर फिरणार आहे. तालुक्यातील खरीप पूर्णता वाया चालला असून दुष्काळाची छाया गडद झाली आहे. यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. पावसाळा सुरू होण्यापूर्वी हवामान खात्याने केलेली भाकिते साफ खोटी ठरल्याचे स्पष्ट झाले आहे. यंदाही पाऊस सरासरी गाठेल, असा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला होता. जून महिन्यात तालुक्यातील काही भाग वगळता समाधानकारक पाऊस पडला. परिणामी खरिपाची पिके बहरली. 

कापूस, सोयाबीन, मूग, बाजरी, तूर, भुईमूग आदी खरिपाची पिकेही चांगलीच बहरताना दिसून आली, मात्र जुलैच्या तिसर्‍या आठवड्यापासून पावसाने आपला खेळ सुरू केला. जोरदार पावसाची वाट पाहणार्‍या शेतकर्‍यांच्या जीवाला घोर लावून गेला. ऑगस्ट महिन्यातही पावसाचा खंड कायम राहिला. परिणामी, खरीप हंगामात घेतलेल्या पिकांतून भरघोस उत्पादन मिळण्याची शेतकर्‍यांची आशा माळवली आहे. गेवराई तालुक्यात मोठे प्रकल्प नसल्याने येथील बहुतांश शेती पावसावरच अवलंबून आहे. त्यामुळे पाऊस दडी मारून बसल्याने खरीप पूर्णतः वाया जाण्याच्या मार्गावर आहे. पावसाळ्याचे दोन महिने उलटुनही तलाव कोरडेच दिसून येत आहेत. यामुळे तालुक्यातील अनेक गावांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे, तसेच जनावरांच्या चार्‍याचाही प्रश्न ऐरणीवर आला आहे. ऑगस्ट महिन्यातही पावसाचा खंड कायम असून पावसाचा थेंबही पडलेला नसून पिकांनी माना टाकल्या आहेत. 

शेतकर्‍यांचे चेहरे काळवंडले

गेवराई, मादळमोही, चकलांबा, रेवकी, तलवाडा, धोंडराई, पाचेगाव, उमापूर, जातेगाव, सिरसदेवी हे दहा महसुली मंडळ आहेत. या मंडळात कापूस, बाजरी, तूर, सोयाबीन, भुईमूग, मका, तीळ आदी पेरणी झालेली आहे, मात्र मागील काही दिवसांपासून पाऊसच नसल्याने मूग, सोयाबीन, भुईमुगांना शेंगा लागल्याच नसून करपण्याच्या मार्गावर आहे. तर कपाशीला पाते, दोड्या लगडल्या नसल्याने खरिपावर पावसाअभावी पाणी फिरले असून खरीप पूर्णता वाया जाण्याच्या मार्गावर असून दुष्काळाची छाया पुन्हा एकदा गडद होतानाचे चित्र आहे. यामुळे शेतकर्‍यांच्या जिवाला घोर लागला असून हवालदिल झाला आहे.