Sun, Jun 07, 2020 07:40होमपेज › Marathwada › दोन लाख नागरिकांच्या सुरक्षेची हमी ४८ पोलिसांवर

दोन लाख नागरिकांच्या सुरक्षेची हमी ४८ पोलिसांवर

Published On: May 29 2018 1:36AM | Last Updated: May 28 2018 11:09PMगेवराई : विनोद नरसाळे

गेवराई शहरासह 78 गाव-वस्त्यांची कायदा आणि सुव्यवस्था सांभाळणार्‍या गेवराई पोलिस ठाण्यात सध्या रिक्त पदांचा प्रश्न गंभीर बनला आहे. येथील तब्बल 40 पदे रिक्त असून कार्यरत असलेल्या केवळ पाच अधिकारी आणि 63 पोलिस असल्याने यंत्रणेवर मोठा ताण पड़त असल्याचे चित्र आहे. यापैकी 15 पोलिस कर्मचारी हे उपविभागीय पोलिस अधिकारी तसेच एसपी कार्यालयात नियुक्त करण्यात आल्याने ठाण्यात अंतर्गत येणार्‍या दोन लाख नागरिकांच्या सुरक्षेची हमी केवळ 48 पोलिसांवर आहे.

गेवराई पोलिस ठाण्याच्या हद्दीत गेवराई शहरासह तब्बल 78 गावे, वाडी-वस्त्या, तांड्याचा समावेश आहे. या सर्व गावातील लोकसंख्या जवळपास दोन लाखांच्या आसपास आहे, मात्र शहरासह ग्रामीण भागातील नागरिकांच्या सुरक्षेची जबाबदारी फक्त 63 पोलिस कर्मचारी व पाच अधिकार्‍यांवर आहे. या पोलिस ठाण्याच्या हद्दीत दोन्ही बाजुने दोन जिल्ह्यांची हद लागते त्यामुळे या भागातही पोलिसांना विशेष लक्ष धावे लागते. त्यातच हद्दीतून जाणार्‍या दोन राष्ट्रीय महामार्गावर सातत्याने अपघात होत असतात. शिवाय महामार्गावरून होणारी तस्करी रोखण्याचेही मोठे आव्हान पोलिसांसमोर असते असे असताना येथे रिक्त पदाचा प्रश्न गंभीर बनला आहे.

वरिष्ठांचे दुर्लक्ष

शहरासह ग्रामीण भागाचा विस्तार पाहता कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी सध्या मंजूर पदांपेक्षाही जास्त पदे असणे आवश्यक आहे, मात्र मंजूर पदांपैकी रिक्त पदेच भरली जात नसून वरिष्ठ याकडे दुर्लक्ष करत आहेत. तालुक्यातील कायदा सुव्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी ठाण्यातील रिक्त पदे भरण्यासह इतर सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत लोकप्रतिनिधींनी लक्ष देणे गरजेचे आहे.

गेवराई पोलिस ठाण्यात कर्मचार्‍यांची 103 पदे  मंजूर असून त्यापैकी केवळ 63 पोलिस ठाण्यात आहेत. तर तब्बल 40 पदे रिक्त आहेत. एक पोलिस निरीक्षक, 5 सहायक पोलिस निरीक्षक अशी पदे मंजूर असून त्यापैकी 4 पोलिस उपनिरिक्षक अधिकारी रुजू आहेत. गेवराई तालुक्यासाठी एक उपविभागीय पोलिस अधिकारी आहेत. हे कार्यालय गेवराई येथेच असून या कार्यालयात व एसपी ऑफिस कार्यालयात 15 पोलिस कर्मचारी नियुक्त करण्यात आल्याने गेवराई पोलिस ठाण्याचा कारभार खरेतर 48 पोलिसांवरच चालू आहे. त्यापैकी एक कर्मचार्‍यांची दोन शिप्ट धरल्यास एकावेळी पोलिस ठाण्यात फक्त 30 पोलिस हजर राहतात.