Sun, May 31, 2020 03:42होमपेज › Marathwada › जिल्ह्यातील मत्स्योत्पादनात होणार मोठी घट

जिल्ह्यातील मत्स्योत्पादनात होणार मोठी घट

Published On: Nov 29 2018 12:58AM | Last Updated: Nov 29 2018 12:58AMबीड : उदय नागरगोजे

जिल्ह्यातील 153 प्रकल्पांमध्ये मासेमारीसाठी ठेका दिला जातो. यंदा मात्र यापैकी 17 तलावांमध्येच थोडाफार पाणीसाठा आहे. उर्वरित तलाव कोरडेठाक पडले असून यामुळे मत्स्योत्पादनात मोठी घट होईल. जिल्ह्यात सरासरी 5 ते 6 हजार टन मत्स्योत्पादन होते. तलाव कोरडे पडल्याने मासेमारीवर उदरनिर्वाह असलेल्या मच्छिमारांसमोर रोजीरोटीचा प्रश्‍न निर्माण झाला आहे.

बीड जिल्ह्यात गत दोन वर्षात बर्‍यापैकी पाऊस झाला. 2016 मध्ये सर्व प्रकल्प तुडूंब भरले होते. गतवर्षी म्हणजे 2017 मध्ये प्रकल्पात कमी पाणीसाठा होता. यावर्षी तर ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्येच बहुतांश प्रकल्प कोरडेठाक पडले आहेत. जिल्हा मत्स्य व्यवसाय विभागाच्या वतीने यावर्षी 136 प्रकल्प मत्स्यपालनासाठी ठेक्याने दिले आहेत. परंतु बहुतांश तलाव कोरडेच असल्याने मच्छिमारांसमोर मोठे संकट निर्माण झाले आहे. तलावांच्या ठेक्यापोटी मत्स्यव्यवसाय विभागाला 50 लाख 52 हजार रुपये मिळाले आहेत. या तलाव ठेक्यातून जे उत्पन्न यातून मिळण्याची अपेक्षा होती, तेही मच्छिमारांना मिळणार नाही. 
दरम्यान ज्या तलावात मासेमारीचा ठेका दिला आहे तेथील पाणीसाठा मृतसाठ्यात असला तरी त्याची पातळी अडीच मिटरपेक्षा जास्त असेल तर ठेक्याचे वर्ष वाढवून दिले जात नाही. आता 17 प्रकल्पांमध्ये थोड्याफार प्रमाणात पाणी आहे, तेथील ठेका वाढवून दिला जाणार का, असा प्रश्‍न निर्माण झाला आहे.

माशांचे दर वाढले

एकीकडे भाज्या, अन्नधान्याचे दर वाढत असताना माशांचे दरही वाढले आहेत. गावरान म्हणून ओळखले जाणारे मरळ, वांब, शेंगटा आदी मासे बाजारात मिळणे अवघड झाले असून मिळाले तरी त्यांच्या दरात किलोमागे 100 रुपयांची वाढ झाली आहे. तर कटला, राहू, मिरकल, सुपर आदी माशांच्या दरातही किलोमागे तीस ते चाळीस रुपयांची वाढ झाली आहे.

उपाययोजना कराव्यात

जिल्ह्यात शेकडो मच्छिमार कुटुंब मत्स्यपालनावर अवलंबून आहेत. तलाव कोरडेठाक पडल्याने त्यांना मजुरी करून पोट भरावे लागत आहे. विविध घटकांसाठी शासन उपाययोजना करत आहे, परंतु मच्छिमारांसाठी अशा काही उपाययोजना होतांना दिसत नाहीत. यावर्षीच्या दुष्काळात मच्छिमारांसाठी विशेष उपाययोजना कराव्यात अशी मागणी फि शरमन कोऑपरेटीव्ही सोसायटीचे सभासद संजीव पाबळे यांनी केली आहे.
नैसर्गिक खाद्याची कमतरता
माशांच्या वाढीसाठी नैसर्गिक खाद्याची आवश्यकता असते. संततधार पावसाने प्रकल्प भरले तरी या खाद्याची निर्मिती होत नाही. यासाठी जोरदार पाऊस पडणे गरजेचे असते. यामुळे विविध ठिकाणची माती पाण्यासोबत वाहून येऊन प्रकल्पाच्या तळाशी जमा होते व तेथील मातीची उत्पादकता वाढते. यातून माशांच्या नैसर्गिक खाद्याची (प्लवंग) वाढ चांगली होते, परंतु यावर्षी जोरदार तर नाहीच, पण संततधार पाऊसही झाला नसल्याने माशांची वाढ होणे अवघड आहे.