Sun, May 31, 2020 02:23होमपेज › Marathwada › मराठवाडा : सतत पडणाऱ्या पावसामुळे पिकावर रोगाचा प्रादुर्भाव

मराठवाडा : सतत पडणाऱ्या पावसामुळे पिकावर रोगाचा प्रादुर्भाव

Published On: Aug 20 2019 3:01PM | Last Updated: Aug 20 2019 3:01PM
वरठाण : प्रतिनिधी 

मराठवाड्यात पावसाअभावी पिके वाळत असताना मराठवाड्याच्या शेवटच्या टोकावरील बनोटी (ता. सोयगाव) मंडळात गेल्या एका महीन्यापासून पडत असलेल्या भीज पावसाने पिकावर मर रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाला आहे.  कृषी विभागाकडून तातडीने पंचनामे करून आर्थिक मदतीची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.

बनोटी मंडळात गेल्या तीन वर्षांपासून सतत पडणार्‍या दुष्काळामुळे शेतकरी हतबल झाला आहे. आगामी हंगाम चांगला होईल या आशेवर नव्या उमेदीने शेती कामात झोकून देत जीवापाड मेहनत घेत शेती मशागतीला लागला होता. शेती तयार झाली नजरा आभाळाकडे लागल्या जूनच्या शेवटच्या आठवड्यात सरी बरसल्याने पेरणी, लागवड केलेले रोपटे वाढू लागले कमी अधिक पावसात पिके डोलू लागली तशी शेतकऱ्याच्या आशा पल्लवित होऊ लागल्या. मात्र, बेभरवशी पावसाने दगा दिला.

तीन आठवडे विश्रांती घेऊन जुलै महीन्याच्या शेवटच्या आठवड्यात परतलेला पाऊस सरीवर-सरी कोसळत वीस दिवस उलटूनही बरसतच राहील्याने शिवार चिंब भिजून नजर पडेल तिकडे पाणीच पाणी दिसू लागले आहे. काळीचा दळ असलेल्या शेतात पिके पावसाचा सामना करताना दिसत आहेत.

मात्र निम्म्या अधिक क्षेत्र असलेली मुरमाळ, खडकाळ जमिनीतील पिकांनी पावसासमोर हार पत्करली पिकांची पाने लाल, पिवळी पडून पाने, फुल मुरझळून गळून माना टाकायला लागली आहेत. मुखेड, पळाशी, वाडी, हनुमंतखेडा, घोरकुंड, तिडका, नांदगाव, घोसला शिवारातील जवळपास हजारो हेक्टर क्षेत्रावरील कपाशी पिकावर मर रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. तर मका, उडीद, मूग, तुर आदी पिके वाया गेली. 
हंगामातील एकमेव आर्थिक उलाढालीचे कपाशी पिक तेही वाया गेल्याने शेतकऱ्यांच्या उरल्या सुरल्या आशेवर पाणी फिरल्याने आर्थिक गर्तेत सापडलेल्या शेतकऱ्याच्या मागे लागलेले दृष्टचक्र पिच्छा सोडायला तयार नाही तरी कृषि विभाग, महसूल विभागाने तात्काळ पंचनामे करून आर्थिक मदतीची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.

२० जुलैपासून सुरुवात झालेला पाऊस आज अखेर सुरू असल्याने शेतात पाणी साचून शेवाळ तयार झाली आहे. पाच एकर क्षेत्रातील कपाशी, मका पावसाने ताण दिल्यागत वाळल्याने संसाराचा गाडा कसा चालवायचा याची चिंता पडली आहे. 
लक्ष्मण सोनवणे, शेतकरी बनोटी

शेतात साचलेले अतिरीक्‍त पाणी शेताबाहेर काढुन कापूस पिकाला खोडाजवळ कॉपर आॕक्‍सिक्‍लोराईड व स्‍ट्रप्‍टोसायक्‍लीन यांची ड्रेंचिग करावी त्‍यामुळे आकस्‍मिक मर रोगास प्रतिबंध करता येईल.
संभाजी पाटील, कृषिसहाय्यक