Sat, Jun 06, 2020 15:38होमपेज › Marathwada › परळी :  दिड लाखाची लाच स्वीकारताना मुख्याध्यापक जेरबंद

परळी :  दिड लाखाची लाच स्वीकारताना मुख्याध्यापक जेरबंद

Published On: Sep 01 2018 6:05PM | Last Updated: Sep 01 2018 6:05PMपरळी वैजनाथ : प्रतिनिधी 

शिक्षणाधिकारी यांच्यासमोर विद्यमान लिपिकाची बाजू मांडण्यासाठी दोन लाख रूपये लाच मागून त्यातील दिड लाखांची रक्कम स्वीकारताना परळी येथील वैद्यनाथ माध्यमिक विद्यालयाचा मुख्याध्यापकास लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने रंगेहात पकडले. नंदकिशोर पापालाल मोदी असे या मुख्याध्यापकाचे नाव आहे. 

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, २०१२ साली वैद्यनाथ माध्यमिक विद्यालयातील चार शिक्षक आणि एक लिपिक यांची नेमणूक नियमबाह्य असल्याचे कारण देत संस्थेने त्यांना सेवेतून कार्यमुक्त केले होते. यातील दोन कर्मचाऱ्यांनी शिक्षण उपसंचालकांकडे तक्रार दाखल केली होती. याची चौकशी बीडचे शिक्षणाधिकारी यांच्याकडे सुरु आहे. या चौकशीत लिपिक पदाच्या संबंधी बाजू मांडण्यासाठी मुख्याध्यापक नंदकिशोर मोदी याने विद्यमान लिपिकाकडे दोन लाखांची लाच मागितली होती. रक्कम न दिल्यास तुमची सेवा समाप्त करून पूर्वीच्या लिपिकास सेवेत पुन्हा रुजू करण्यात येईल असेही मोदी याने विद्यमान लिपिकास बजावले होते. 

या लिपीकाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या बीड शाखेत यासंबंधी तक्रार दाखल केली होती. या तक्रारीनुसार बीड  लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून मोदी यांच्यावर पाळत ठेवण्यात आली होती. मोदी याने आज, (दि. १ सप्टेंबर) रोजी दिड लाख रुपये स्वीकारण्याचे आणि उर्वरित ५० हजार एक महिन्यानंतर स्वीकारण्याचे मान्य केल्याचे आढळून आले. त्यानुसार आज, शनिवार रोजी बीड एसीबीच्या पथकाने मुख्याध्यापक मोदी याच्या पेठ गल्ली देशमुख पार  येथील राहत्या घराच्या परिसरात सापळा रचला. ठरल्याप्रमाणे विद्यमान लिपिकाने दिलेली दिड लाखांची रक्कम स्वीकारताच मुख्याध्यापक मोदी याला एसीबीच्या पथकाने रंगेहाथ पकडले.

ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधकाचे पोलीस अधीक्षक श्रीकांत परोपकारी, अपर अधीक्षक एस.आर. जिरगे यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक बाळकृष्ण हनपुडे पाटील, पोलीस निरीक्षक वाघ, पोलीस कर्मचारी कल्याण राठोड, आदीनी केली.