Sat, Sep 21, 2019 05:59होमपेज › Marathwada › उस्मानाबाद जिल्ह्यात पाणी खोल खोल!

उस्मानाबाद जिल्ह्यात पाणी खोल खोल!

Published On: Jun 13 2019 1:34AM | Last Updated: Jun 13 2019 12:40AM
उस्मानाबाद, प्रतिनिधी

एक वर्षाचा अपवाद वगळता सलग पाच वर्षे दुष्काळाचा सामना करीत असलेल्या जिल्ह्याची भूजल पातळी झपाट्याने खालावत आहे. त्यातही भूम तालुक्यातील पातळी नीचांकी असून तुलनेने लोहार्‍याची परिस्थिती समाधानकारक आहे. जिल्ह्यातील आठही तालुक्यांची सरासरी पाहता जिल्ह्यात 1.59 मीटरने पाणी खोल गेले आहे.

सतत दुष्काळाचा सामना करत असलेल्या उस्मानाबादवर गेल्या वर्षीही वरुणराजाने अवकृपा केली. सरासरीच्या केवळ 50 टक्केच पाऊस झाल्याने खरीप पिकेही हातची गेली. रब्बीची पेरणी तर बहुतांश तालुक्यांत झालीच नाही. टँकरच्या पाण्याला मर्यादा असल्याने अनेकांनी बोअरला पसंती दिली. बोअर घेण्यासाठी 200 फुटांची मर्यादा असली तरी सातशे ते आठशे फुटांपर्यंत बोअर मारूनही अनेक ठिकाणी पाणीच लागत नाही. त्यामुळे सर्वसामान्यांचे यंदा पाण्यासाठी हाल झाले. या पार्श्‍वभूमीवर आता जमिनीत पाणी मुरविण्यासाठी नागरिकांनी पुढाकार घेण्याची आवश्यकता व्यक्त होत आहे. जिल्ह्यात 114 निरीक्षण विहिरी आहेत. या सर्वांचे मे महिन्यातील निरीक्षण पाहता भूजल पातळीच्या बाबतीत जिल्ह्याची वाटचाल भीषण पाणीटंचाईकडे सुरू असल्याचे स्पष्ट होते. भूजल सर्वेक्षण विभागातर्फेही आता भूजल पातळी वाढविण्यासाठी खास उपक्रम हाती घेतला जाणार आहे.

मे 2019 मधील तालुकानिहाय भूजलपातळी (मीटरमध्ये)

तालुका                पातळी        घट       

उस्मानाबाद         12.47       1.65       
तुळजापूर             11.77       0.89       
उमरगा                11.38       0.77       
लोहारा                 10.49       0.53       
कळंब                  11.64       1.81       
भूम                    15.98       3.45       
वाशी                   15.13       2.58       
परंडा                   13.41       1.03       
जिल्हा                 12.78       1.59