Thu, Jun 04, 2020 23:01होमपेज › Marathwada › ‘रंग दे महाराष्ट्र’तून शाळा, अंगणवाड्या चकाकणार 

‘रंग दे महाराष्ट्र’तून शाळा, अंगणवाड्या चकाकणार 

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

अंबाजोगाई : रवी मठपती

शासनाच्या ‘रंग दे महाराष्ट्र’  उपक्रमांतर्गत अंबाजोगाई, परळी व केज या आठ गावांचा समावेश करण्यात आला आहे. पैकी पाच गावांमध्ये शाळा व अंगणवाड्यांची रंगरंगोटी करण्यात येणार आहे. यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून निधीअभावी भकास झालेल्या शाळा आता टवटवीत दिसणार आहेत. 

सामाजिक समस्यांविषयी जागरुकता निर्माण करणे, सामाजिक विकासाच्या पातळीवर काम करण्यासाठी नागरिकांना सहभागी करून घेण्याच्या मोहिमेअंतर्गत एमव्हीएसटीएफ संघटनेने आंतरराष्ट्रीय रंग दिनाचे औचित्य साधून रंगले महाराष्ट्र मोहिमेचे आयोजन केले आहे. सदर मोहीम कन्साई  नेरोलॅक आणि टाटा ट्रस्टच्या भागीदारीतून  राबविण्यात येत आहे.‘रंग दे महाराष्ट्र’ उपक्रम राज्यातील साडेतीनशे शाळा, अंगणवाड्या व ग्रामपंचायतीमध्ये राबविण्यात येणार आहे. या उपक्रमात  जिल्ह्यातील 8 गावे समाविष्ट करण्यात आले आहेत. परंतु सध्यातरी 5 गावांमध्ये ‘रंग दे  महाराष्ट्र’ योजनेअंतर्गत शाळा व अंगणवाड्यांची रंगरंगोटी करण्यात येणार आहे. 

समाज विकास आणि ग्रामीण विकासातील सूत्रबद्धता साधणे हे या उपक्रमाचे ध्येय आहे.  शिक्षण, स्वच्छता आणि पोषण आहार, लिंग समानता या प्रमुख सामाजिक प्रश्नावर लक्ष केंद्रित करून जागरूकता निर्माण करणे हा मुख्य उद्देश आहे. याबाबतची कार्यवाही लवकरच सुरू करण्यात येणार आहे.

सामाजिक संदेश

या उपक्रमाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील शाळा, अंगणवाड्या व ग्रामपंचायतीच्या भिंतीवर सामाजिक संदेशाचे दर्शन घडविण्यात येणार आहे. तसेच शाळा, अंगणवाडी व ग्रामपंचायतीच्या इमारती केवळ रंगीत होणार नाहीत तर या उपक्रमाच्या सहभागातून अधिक जागरुकता निर्माण होणार आहे.

इमारतीची प्रतीक्षा

अंबाजोगाई तालुक्यात एकूण 251 अंगणवाड्या आहेत त्यापैकी  145 अंगणवाड्यांना स्वतःची इमारत आहे. तर उर्वरित 106  अंगणवाड्या नवीन इमारतीच्या प्रतीक्षेत आहेत. सद्यस्थितीत 106 अंगणवाड्यांतील विद्यार्थी शाळा अथवा ग्रामपंचायतीच्या सभाग्रहात शिक्षण घेत आहेत. अंगणवाड्यांच्या दुरुस्तीसाठी निधी उपलब्ध होणे आवश्यक आहे. नवीन इमारत बांधकामाबाबत नेहमी दर सहा महिन्याला पाठपुरावा केला जातो.

या गावांचा समावेश

अंबाजोगाई तालुक्यातील पठाण मांडवा व हिवरा परळी तालुक्यातील परचुंडी व करेवाडी, केज तालुक्यातील चंदनसावरगाव व पळस खेडा, धारूर तालुक्यातील कोळपिंपरी व वरकटवाडी यांचा समावेश करण्यात आला आहे. पैकी मांडवा पठाण, करेवाडी, कोळपिंपरी, पळस खेडा, चंदनसावरगाव या गावांत हा उपक्रम होणार आहे. 

 

Tags : Ambajogai, Parli, Kej, Rang De Maharashtra, school, 


  •