Sun, May 31, 2020 02:17होमपेज › Marathwada › छावणीचा अहवाल देण्यासाठी मागितली लाच; तीन अधिकार्‍यांवर गुन्हा

छावणीचा अहवाल देण्यासाठी मागितली लाच; तीन अधिकार्‍यांवर गुन्हा

Published On: May 24 2019 10:26PM | Last Updated: May 24 2019 10:26PM
बीड : प्रतिनिधी 

तालुक्यातील शिवणी येथील जनावरांच्या छावणीचा सकारात्मक अहवाल देण्यासाठी पैसे मागणार्‍या वस्तु व सेवा कर कार्यालयाच्या तीन कर निरीक्षकांवर पिंपळनेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकार्‍यांनी आज, शुक्रवार (दि.२४) सायंकाळच्या सुमारास ही कारवाई केली.

मारोती गंगाधर मुपडे, गोविंद रमेशराव लोळगे व भारत साजन मेहेर असे या गुन्हा दाखल झालेल्या कर निरीक्षकांची नावे आहेत. हे सर्व आरोपी बीड येथील वस्तु व सेवा कर कार्यालयात राज्य कर निरीक्षक पदावर कार्यरत आहेत. 

बीड तालुक्यातील शिवणी येथील जनावरांची छावणी तक्रारदार चालवत आहे. 10 एप्रिल रोजी जीएसटी कार्यालयाचे कर निरीक्षक हे छावणी तपासणीसाठी शिवणी येथे गेले. छावणीमध्ये मोठ्या प्रमाणात त्रुटी आहेत, चारा छावणीचा सकारात्मक अहवाल जिल्हाधिकार्‍यांना पाठवण्यासाठी मुपडे, लोळगे व मेहेर यांनी तक्रारदाराकडे पंचवीस हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. त्यांना लाच देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदाराने बीड येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली. त्या अनुषंगाने 10 एप्रिल रोजी जरुड फाटा येथे लाच मागितल्याची खात्री केली असता तडजोडीअंती 15 हजाराची लाच रक्कम स्विकारण्याचे मान्य केले. परंतु त्यांना तक्रारदाराचा संशय आल्याने त्यांनी लाच रक्कम स्विकारली नाही. या प्रकरणी मारोती मुपडे, गोविंद लोळगे व भारत मेहेर या राज्य कर निरीक्षकांविरुद्ध लाचेची मागणी निष्पन्न झाल्याने त्यांच्याविरुद्ध पिंपळनेर पोलिस ठाण्यात शुक्रवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला. 

ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस अधिक्षक श्रीकांत परोपकारी,अप्पर पोलिस अधिक्षक ए.एस.जिरगे यांच्या मार्गर्दशनाखाली पोलिस उपअधिक्षक हनपुडे पाटील व त्यांच्या सहकार्‍यांनी केली.