Sun, Oct 20, 2019 16:29



होमपेज › Marathwada › स्व. मुंडे यांच्या संस्काराने वंचितांच्या सेवेचे बळ

स्व. मुंडे यांच्या संस्काराने वंचितांच्या सेवेचे बळ

Published On: Dec 13 2018 1:36AM | Last Updated: Dec 13 2018 12:43AM




परळी : प्रतिनिधी

लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांनी आम्हा तीनही मुलींवर चांगले संस्कार केले, खंबीरपणे वाढवले. त्यांनी आम्हाला हिंमत तर दिलीच पण त्याचबरोबर दयाळूपणाही शिकवला. या संस्कारामुळे समाजातील वंचित पीडित घटकांची सेवा करण्याचे बळ आम्हाला मिळते असे सांगून समाजाला लोकनेते मुंडे यांची आठवण सातत्याने येत राहील. वारसा आणि नेते बदलणार्‍या नेत्यांचे मनसुबे कधीच यशस्वी होणार नाहीत असा टोलाही  पंकजा मुंडे यांनी लगावला.

लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या जयंतीचे औचित्य साधून गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठान व राष्ट्रीय आरोग्य अभियान यांच्या संयुक्त विद्यमाने गोपीनाथ गडावर आयोजित केलेल्या महाआरोग्य शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी पंकजा मुंडे बोलत होत्या. मंत्री राम शिंदे, महादेव जानकर, राष्ट्रीय भटक्या विमुक्त आयोगाचे माजी अध्यक्ष दादा इदाते, खा. डॉ. प्रीतम मुंडे, आ. आर टी देशमुख, आ. संगीता ठोंबरे, आ. भीमराव धोंडे, आ. लक्ष्मण पवार, आ. सुरेश धस, आ. सुधाकर भालेराव, आ. मोहन फड, आ. मोनिका राजळे,  गोविंदराव केंद्रे, रमेश पोकळे,  सविता गोल्हार,  रमेश आडसकर, फुलचंद कराड, बाबुराव पोटभरे, डॉ. भागवत कराड, प्रवीण घुगे,  भाऊराव देशमुख, राजेंद्र मस्के, राजेश देशमुख, धम्मानंद मुंडे, गणेश हाके, डॉ. स्वरूपसिंह हजारी आदी यावेळी उपस्थित होते. 

पंकजा मुंडे म्हणाल्या, आज लोकनेते मुंडे यांची जयंती नाही तर वाढदिवस आहे. त्यांच्या आठवणी दिवसेंदिवस गडद होत आहेत, हया आठवणी जेवढ्या वेदना देतात, तेवढीच प्रेरणाही देतात. केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर, निवडणूक प्रचारानिमित्त मी जेव्हा तेलंगणा, मध्य प्रदेशात गेले तेव्हा तिथेही त्यांची पूजा होते हे पहायला मिळाले. त्यांचे अर्धवट राहिलेलं काम पूर्ण करण्याची संधी मला मिळाली, हे माझे भाग्य आहे. त्यांचा लोकसंग्रह एवढा आहे की त्यांच्यावर असलेले लोकांचे प्रेम दिवसेंदिवस वाढतच आहे, ही वाढ अशीच कायम होत राहील असे काम माझ्या हातून होतील. माझ्या प्रत्येक भूमिकेचा चेहरा व रंग वेगळा असला तरी आत्मा मात्र गोपीनाथ मुंडे यांचाच आहे, त्यामुळे  त्यांचे नाव जगाला विसरू देणार नाही अशी शपथ मी घेतली आहे. याप्रसंगी मंत्री राम शिंदे, महादेव जानकर आ. आर टी देशमुख,आ. संगीता ठोंबरे, आ. सुरेश धस, आ. सुधाकर भालेराव, आ. मोहन फड, आ. मोनिका राजळे, आ. पवार, गोविंदराव केंद्रे, बाबुराव पोटभरे, फुलचंद कराड, राधाताई सानप, यांनी आपल्या भाषणात मुंडे साहेबांच्या आठवणींना उजाळा दिला. कार्यक्रमाचे संचलन राम कुलकर्णी यांनी तर जिल्हा शल्य चिकित्सक डॉ अशोक यांनी प्रास्ताविक केले. खा.डॉ.प्रितम मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली अतिशय शिस्तबद्ध वातावरणात पार पडलेल्या या कार्यक्रमात प्रत्येक जण गोपीनाथराव मुंडे यांच्या समाधीवर डोके ठेवतांना त्यांच्या आठवणीने गहिवरून गेला. 

मुख्यमंत्र्यांचा ऑडीओ संदेश

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खास ऑडिओ संदेश पाठवून गोपीनाथ मुंडे यांना अभिवादन केले. भाजपला बहूजनांचा चेहरा देणार्‍या गोपीनाथ मुंडे यांनी आयुष्यभर संघर्ष करत भाजपला सत्तेपर्यत पोहोचविले. आज आम्ही त्यांच्यामुळेच सत्तेत आहोत अशा शब्दांत त्यांनी भावना व्यक्त केल्या. 

हा यज्ञ समाजसेवेचा 

दुष्काळात सापडलेल्या गरजू रुग्णांच्या मदतीसाठी आयोजिलेला हा यज्ञ  समाजसेवेचा असल्याचे सांगून त्या म्हणाल्या की, आर्थिक परिस्थितीअभावी अनेकांना उपचार करणे शक्य होत नाही. अशांना मोफत तपासणी औषधोपचार व शस्त्रक्रिया अशी सेवा आम्ही देत आहोत. सरकारी डॉक्टरांबरोबरच खासगी डॉक्टरही या सेवेत आहेत. प्रत्येक आजारी माणूस इथून ठणठणीत बरा व्हावा. समाजातील प्रत्येक घटकानेही यात आपापल्या परीने मदत द्यावी तरच हा यज्ञ यशस्वी होईल असे त्या म्हणाल्या.

बीडचे गँगवॉर मी संपविले

लोकनेते मुंडे यांनी गृहमंत्री असताना महाराष्ट्रातील गँगवॉर संपवले होते. तसे बीड जिल्ह्याच्या राजकारणातील गॅगवॉर संपण्यात मला यश मिळाले आहे. एक सुसंस्कृत राजकारणी म्हणून आम्ही काम करतो, आता त्यांची मुळं जमिनीत खोलवर गेली आहेत, ही मुळं चांगल्या विचारांची व संस्कृतीची आहेत, दहशतीची किंवा कुणाला त्रास देणारी नाहीत असे त्या म्हणाल्या. बीड जिल्ह्याचा विकास तर एक झांकी आहे अजून खूप काही करायचे बाकी आहे.

मुंडेंचे विचार आत्मसात करा : दादा इदाते

यावेळी दादा इदाते यांनी समाजाच्या भल्यासाठी मुंडे यांचे विचार कार्यकर्त्यांनी आत्मसात आणण्याची गरज असल्याचे सांगितले. पंकजा मुंडे यांचे नेतृत्व कणखर आहे हे नेतृत्व देशाला मार्गदर्शक ठरेल अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या. लोकतेने  गोपीनाथ मुंडे यांचा वारसा त्यांच्या लेकी कणखरपणे पुढे नेत असल्याचा गौरवपूर्ण उल्‍लेख यावेळी इदाते यांनी केला.

विरोधकांवर हल्लाबोल : पंकजा मुंडे यांनी यावेळी आपल्या भाषणात राजकारणातील आपल्या प्रतिस्पर्ध्यांवर हल्लाबोल केला. लोकनेते मुंडे यांनी आयुष्यात अनेक आघात सहन केले पण आपल्या माणसांकडून झालेल्या आघाताने त्यांच्या मनाला खूप वेदना झाल्या. अनेक लोकांना त्यांनी घडवले दुःखावर फुंकर घातली, पण कधी कोणाच्या पाठीत खंजीर खुपसण्याचे काम केले नाही. सध्या काही जण मात्र एकीकडे त्यांचा वारसा सांगतात आणि नाव मात्र दुसर्‍याचे घेतात असा दुटप्पी पणा फार काळ चालणार नाही. माझे नुकसान करताना इतरांच्या दहा चुली बंद करण्याचे पाप करू नका, समोरून वार करा, हारले तर सन्मानाने हार स्वीकारेल आणि जिंकले तर तुमचा सन्मान वाढवेल अशा शब्दांत त्यांनी विरोधकांचा समाचार घेतला.