Sat, Jun 06, 2020 23:01होमपेज › Marathwada › गावोगावची तंटामुक्ती समिती उरली नावापुरती

गावोगावची तंटामुक्ती समिती उरली नावापुरती

Published On: Apr 23 2018 1:16AM | Last Updated: Apr 22 2018 11:05PMअंबाजोगाई  : रवी मठपती 

काही वर्षांपूर्वी गावागावात पोहचलेली तंटामुक्तीची मोहिम आता थंडावल्याचे दिसत आहे. अंबाजोगाई तालुक्यात महात्मा गांधी तंटामुक्ती समित्या गेल्या कांही वर्षांपासून गठीत करण्यात आल्या नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. कांही वर्षांपूर्वी तंटामुक्तीचा पुरस्कार मिळालेली गावं पोलिस निरीक्षकांकडून मार्गदर्शन व प्रेरणा मिळत नसल्याकारणाने अशा महत्वपूर्ण समित्यांपासून दूरच असल्याचा आरोप गावकर्‍यांकडून होत आहे. अंबाजोगाई तालुक्यात कुंबेफळ व जवळगाव या दोन ठिकाणी तंटामुक्ती समिती कार्यरत असल्याचे पोलिस प्रशासनाने सांगितले. पोलिस पाटीलांची संख्या  तालुक्यात अवघी अठरा आहे. 

गावपातळीवर निर्माण होणारे वाद तंटे कमी करून गावात  सामाजिक सलोखा अबाधित राखण्यासाठी तत्कालीन दिवंगत उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील यांनी महात्मा गांधी तंटामुक्ती समिती स्थापन करण्याचा महत्वाचा निर्णय घेतला. उत्कृष्ट काम करणार्‍या गाव समितीस पुरस्कारही दिला जातो. अंबाजोगाई तालुक्यातील देवळा, श्रीपतरायवाडी, सुगाव तळेगाव घाट, वालेवाडी, भतानवाडी, साळुंकेवाडी, मुडेगाव, पूस इत्यादी गावांना काही  वर्षांपूर्वी सरकारने पुरस्कार व बक्षीस  देऊन सन्मानित केले.

तंटामुक्ती समिती  मोहीम सध्या बाजूलाच पडली आहे. त्यामुळे गावा गावात अवैध धंद्यानी कळस गाठला असून याकडे पोलिस प्रशासन आणि पोलिस पाटील यांचे हेतू पुरस्सर दुर्लक्ष होत असल्याचा आरोप गावागावातील नागरिकांकडून होताना दिसत आहे.

गाव पातळीवर तंटामुक्ती समितीचे गठण करून तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षांची नेमणूक केली जाते. समितीला मार्गदर्शक म्हणून तालुकास्तरीय तंटामुक्ती समितीने मार्गदर्शन करण्याची गरज असते. यासाठी आवश्यक असलेल्या बैठका तालुका पातळीवर होत नाहीत. महात्मा गांधी तंटामुक्ती तालुका समिती अध्यक्ष, तहसीलदार व नियंत्रक सचिव, पोलिस निरीक्षक यांनी वेळोवेळी या समित्यांना मार्गदर्शन करणे गरजचे असताना याकडे सर्वांचे दुर्लक्ष होताना दिसत आहे. गावातील अवैध धंद्यांसह इतर गैरप्रकारांना आळा घालण्याची जबाबदारी पोलिस प्रशासन, गावातील तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष, पोलिस पाटील यांची आहे; परंतु मात्र या गोष्टीकडे कोणीच लक्ष देत नसल्याचे आरोप  नागरिकांकडून होत आहेत.

 

Tags : beed, Ambajogai news, Tantamukti Committee,