Mon, Jul 06, 2020 03:49होमपेज › Marathwada › अवैध धंद्यांविरोधात कारवाई करा 

अवैध धंद्यांविरोधात कारवाई करा 

Published On: Jun 22 2018 2:08AM | Last Updated: Jun 21 2018 11:02PMबीड : प्रतिनिधी

जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी 15 ऑगस्टपर्यंत जिल्ह्यातील अवैध धंदे करणार्‍यांविरुद्ध मोहीम राबवून, त्यांच्यावर कारवाई करण्याच्या सूचना पोलिस अधीक्षकांना पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी गुरुवारी दिल्या. 

जिल्हाधिकारी कार्यालयात विविध विभागांतील विविध योजनांचा आढावा घेणारी मॅरेथॉन बैठक  पार पडली. बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत याविषयी माहिती देताना त्या बोलत होत्या. यावेळी खासदार डॉ.प्रितम मुंडे, आमदार प्रा.संगिता ठोंबरे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सविता गोल्हार, भाजपचे जिल्हाध्यक्ष रमेश पोकळे, जिल्हाधिकारी एम.डी. सिंह, सीईओ अमोल येडगे आदी उपस्थित होते. आपल्या कार्यकाळात जिल्ह्यात पूर्वीपासून रखडलेल्या विविध विकासकामांना चालना मिळाली असून राष्ट्रीय महामार्ग, रेल्वेचे काम, शौचालय उभारणीची कामे सुरू आहेत.

रेल्वेचा काम प्रगतीपथावर

रेल्वेसाठी बीडमध्ये अतिरिक्त जागेची गरज नसल्याचे रेल्वे विभागाचे मत असल्याने अतिरिक्त भूसंपादन होणार नाही. रेल्वेची ट्रायल जुन्या इंजीनवर सुरू असून, नवीन इंजीनवर ट्रायल करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. आगामी 2019 पर्यंत रेल्वेला हिरवा झेंडा दाखविण्याचा प्रयत्न असल्याचा दावाही यावेळी पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी केला.  जिल्ह्यात रेल्वेचे काम वेगाने सुरू आहे. रेल्वेसाठी 1334 हेक्टर जमीन संपादित करण्यात आलेली आहे. अद्यापही जवळपास 201 हेक्टर जमिनीचे संपादन बाकी आहे. मावेजा वाटपाचे कामही वेगाने सुरू आहे, असे पालकमंत्री मुंडे यांनी सांगितले.