Thu, Jun 04, 2020 22:34होमपेज › Marathwada › थकीत ऊसबिलासाठी स्वाभिमानीचे आंदोलन

थकीत ऊसबिलासाठी स्वाभिमानीचे आंदोलन

Published On: Dec 05 2018 1:25AM | Last Updated: Dec 06 2018 1:36AM
परभणी : प्रतिनिधी

गंगाखेड शुगर (ता.गंगाखेड) या कारखान्याने ऊस बिलाची थकीत रक्‍कम शेतकर्‍यांना तात्काळ द्यावी यासाठी 7 सप्टेंबर 2018 रोजी आयुक्‍त, साखर संकुल पुणे, 19 नोव्हेंबर रोजी सहसंचालक (साखर) प्रादेशिक सहसंचालक कार्यालय नांदेड यांना रक्‍कम देण्यासंदर्भात दिलेल्या तक्रारीचा संदर्भ देऊन 4 डिसेंबर रोजी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने जिल्हाधिकारी कार्यालयात आंदोलन केले. जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात शेतकर्‍यांनी भाजी-भाकर खाऊन मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकार्‍यांना दिले. 

मागील वर्षी गंगाखेड शुगर लि. ता. गंगाखेड जि.परभणी या कारखान्यानेने शेतकर्‍यांचा ऊस नेला तेंव्हा कारखान्याने 2200 प्रति टन प्रमाणे असा भाव देतो असे सांगीतले. सुरुवातीस काही शेतकर्‍यांना रुपये 2 हजार तर उर्वरित शेतकर्‍यांना 1 हजार 500 रुपये भाव दिला. शासन निर्णयानूसार ऊस नेल्यावर 14 दिवसाच्या आत एकरक्‍कमी एफआरपी देणे बंधनकारक आहे. जवळपास एक वर्ष होत असुनही कारखान्याने अद्यापर्यंत शेतकर्‍यांचे पैसे दिले नाहीत. 

कारखान्याने शेतकर्‍याच्या ऊस बिलातून तोडणी व वाहतूक भाडे हे जास्तीचे रुपये 1955 कपात केले आहे. वाहतूक व तोडणी रुपये 1155 एवढा खर्च महाराष्ट्रात कोणत्याही कारखान्याने आकारलेला नाही. साखर आयुक्‍ताने या प्रकाराची चौकशी समिती नेमली आहे . 

पुढे कारखाना दोषी ठरेल तर शेतकर्‍यांचे काराखान्याकडे 700 ते 800 रुपये निघतात. परंतू कारखान्याने मागील वर्षी जाहिर केलेल्या बिलातील राहिलेली रक्‍कम रुपये 500  10 डिसेंबर 2018 पर्यंत सदरील रक्‍कम शेतकर्‍यांच्या खात्यावर करावी. अन्यथा स्वाभिमानी शेतकरी संघटना 11 डिसेंबर  पासून आमरण उपोषण सुरु करण्यात येईल. असा इशारा यावेळी आंदोलक शेतकर्‍यांनी दिला आहे. या आंदोलनात ऊस नियंत्रण मंडळाचे सदस्य प्रल्हाद इंगोले, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष किशोर ढगे, डिगांबर पवार, दिपक भालेराव, केशव आरमाळ यांच्यासह अनेक शेतकरी उपस्थित होते.