Sun, Jun 07, 2020 07:38होमपेज › Marathwada › ऊसतोड महिलांचे गर्भाशय काढून टाकल्याचा संशय

ऊसतोड महिलांचे गर्भाशय काढून टाकल्याचा संशय

Published On: Apr 11 2019 12:16AM | Last Updated: Apr 11 2019 12:16AM
बीड : प्रतिनिधी 

बीड तालुक्यातील वंजारवाडी व शिरूर कासार तालुक्यातील हाजीपूर येथील काही ऊसतोड महिलांचे गर्भाशय काढून घेतले जात असल्याचा संशय आहे. त्याची गांभीर्याने दखल घेत आरोग्य विभाग व महिला राज्य आयोगाने चौकशीचे आदेश दिले आहे. त्या अनुषंगाने जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक थोरात यांनी समिती नेमली असून सर्व  रुग्णालयांकडून गर्भाशय शस्त्रक्रियांची माहिती घेतली जात आहे.  

बीड जिल्ह्यातील महिलांना गर्भाशयच नाही असे वृत्‍त एका इंग्रजी दैनिकात दोन दिवसापूर्वी प्रसिद्ध झाले होते. बीड जिल्ह्यात गर्भाशय काढण्याचा बाजार मांडला गेलाय. गर्भाशयाचा कोणताही आजार असो तात्काळ पिशवी काढण्याचा सल्ला खासगी रुग्णालयात दिला जातो. त्यातच दरवर्षी बीड जिल्ह्यातून दोन लाख महिला ऊस तोडणीसाठी हातात कोयता घेऊन राज्यभरातील कारखान्यावर जातात. ऊस तोडणीसाठी जात असताना दोन, तीन मुले झाली की गर्भाशय काढले जाते. त्यामुळे मासिक पाळीची समस्याच राहत नाही आणि महिलांचा वेळ वाया जात नाही. या कारणाने गर्भाशयाची पिशवी काढण्यावर भर असतो, असे त्या वृत्‍तात नमुद करण्यात आले होते. याची दखल घेत आरोग्य विभाग खडबडून जागे झाले तसेच राज्य महिला आयोगाच्या प्रशासकीय अधिकारी ए. एस. सोज्वळ यांनी जिल्हाधिकारी कार्यालयास पत्र पाठवून ऊस तोड महिलांचे गर्भाशय काढले जात आहे का? याची पडताळणी करावी अशा सूचना दिल्या आहेत. तसेच आरोय उपसंचालकांनीही जिल्हा शल्य चिकित्सकांना चौकशीचे आदेश दिले आहे. त्यानुसार कारवाईला सुरुवात झाली.

शिरूर तालुक्यात सर्वाधिक कामगार
जिल्ह्यात सर्वाधिक ऊसतोड कामगार शिरूर तालुक्यात आहेत तसेच धारूर, गेवराई मध्येही कामगारांचे प्रमाणात कमी अधिक आहे. ऊसतोडणी करताना महिलांना मासिक पाळी येऊ नये यासह विविध उद्देश समोर ठेवून त्यांचे गर्भाशय काढले जात असल्याचा संशय आहे. खासगी दवाखान्यातील डॉक्टरही महिलांना गर्भाशयाचे आजार झाल्याची भीती दाखवून चक्‍क पिशवी काढून टाकण्याचा सल्‍ला देत असून महिलाही भीतीपोटी गर्भाशय काढत असल्याचा संशयही बळावला आहे. या दृष्टीने जिल्हा रुग्णालयाकडून विविध स्तरावरुन चौकशी केली जाणार असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.