Sun, Jun 07, 2020 14:57होमपेज › Marathwada › ‘आजारी’ पोलिसांना निलंबनाचे इंजेक्शन! १५ कर्मचारी निलंबीत

‘आजारी’ पोलिसांना निलंबनाचे इंजेक्शन! १५ कर्मचारी निलंबीत

Published On: Dec 04 2018 7:37PM | Last Updated: Dec 04 2018 7:37PMउस्मानाबाद : पुढारी ऑनलाईन 

मनासारखी बदली नसली की महिनाभर ‘सिक’मध्ये... विशिष्ट पोलिस ठाणे मिळवायचे असेल तर त्यासाठी प्रयत्न करण्यासाठी महिन्याची ‘सिक..!’ अनेकांना तर आजारी रजेचे व्यसन असल्यासारखी स्थिती आहे. उस्मानाबाद पोलिस दलात हा विषय नेहमीच चर्चेचा असतो. त्यामुळेच अशा आजारी रजेवर असलेल्या १५ ‘सिक’बहाद्दरांना पोलिस अधीक्षक आर. राजा यांनी थेट निलंबनाचे इंजेक्शन दिले आहे. 

उस्मानाबाद जिल्ह्यात १७  पोलिस ठाणी आहेत. प्रत्येक पोलिस ठाण्यात अशा दांडीबहाद्दर पोलिस कर्मचार्‍यांची संख्या मोठी आहे. अनेकांना आजारी रजेचे व्यसन आहे की काय, असे म्हणण्यासारखी परिस्थिती आहे. १५ ते २०  दिवस ड्युटी केली की नोकरीचा ताण नको म्हणून अनेकजण ‘आजारी’ पडतात. वरिष्ठांशी एखाद्या कारणावरुन खटका उडाल्यानंतरही अनेकांना आजारीच पडावे लागते. ही उदाहरणे जिल्ह्यात आहेत. त्यामुळे जे नियमीत सेवा बजावतात त्यांच्यावरच कायदा, सुव्यवस्था सांभाळण्याची तसेच दैनंदिन कामकाज सांभाळण्याची जबाबदारी पडते. त्यांच्यावरील ताणही मोठा असतो. हे पाहूनच पोलिस अधीक्षक राजा यांनी अशा सतत ‘आजारी’ पोलिस कर्मचार्‍यांवर लक्ष ठेवले. त्यासाठी खास यंत्रणा उभारली. अनेकजण आजारी नसतानाही केवळ रजेसाठी ‘आजारी’ पडून कामचुकारपणे करत असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर अशा १५ जणांना निलंबीत केले आहे. या कारवाईने जिल्हा पोलिस दलात खळबळ उडाली आहे.