Sat, Jun 06, 2020 23:39होमपेज › Marathwada › कडक उन्हाळ्याने अधिक विजेची मागणी

कडक उन्हाळ्याने अधिक विजेची मागणी

Published On: May 11 2018 1:39AM | Last Updated: May 11 2018 12:40AMपरळी : रवींद्र जोशी

कडक उन्हाळ्याने जीवाची लाही लाही होत आहे. याचा मोठा परिणाम विजेच्या वापरावर पण झाला आहे. तीव्र उन्हाळ्याच्या दिवसात  अधिक विजेची मागणी आपोआपच होत असून  महावितरणचा ‘लोड’ वाढला असल्याचे सांगितले जाते. या परिस्थितीत ही खंडित वीजपुरवठा ‘परंपरा’ मात्र कायम असल्याचे दिसून येते. या खंडित होणार्‍या वीज पुरवठ्याने भरदुपारी आणि रात्रीच्या वेळी नागरिक वैतागून जात आहेत. 

वीज निर्मिती करणार्‍या परळी शहरातच सातत्याने दिवस-रात्रं वीज पुरवठा खंडित होत असल्याने अंधाराचे साम्राज्य पसरत असून 44 अंश डिग्री सेल्सियस एवढ्या कमालीच्या तापमानात वीज बंद असल्याने बसल्या जागेवर माणूस घामाघूम होत आहे. यामुळे वृद्धांना सर्वाधिक त्रास होत असून काही परीक्षा अद्याप व्हायच्या असल्याने विद्यार्थ्यांनाही आपल्या अभ्यासात व्यत्यय येत आहे, दरम्यान वाढत्या उष्णतेमुळे विजेची मागणी वाढत असून त्यामुळेच वीजपुरवठ्यात व्यत्यय येत असल्याचे महावितरणने सांगितले आहे. कारणे काहीही असोत वाढत्या उष्णतेत आम्ही भाजून निघत असून आम्हाला वीज द्या, आम्ही बिल भरतो अशी तक्रार वीज ग्राहक करीत आहेत. 

परळी  शहर राज्याच्या बहुतांश भागाला वीज देते तेच शहर मागील काही दिवसांपासून अंधारात चाचपडत आहे. वीज पुरवठ्यात सुधारणा करण्याची महावितरणची कोणती तयारी दिसत नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.  परळी शहरातील सर्वच भागात विशेषत: हालगे गल्ली. मोंढा परिसर, गणेशपार, गांधी मार्केट, अंबेवेस, जुना गाव भाग आदी भागातील वेगवेगळया फिडरवर सध्या विजेची मागणी वाढली आहे. दिवस असो किंवा रात्र पंखा किंवा कुलर लावल्याशिवाय माणूस घरात किंवा दुकानात बसूच शकत नाही, परंतु मागच्या दोन आठवड्यांपासून परळी शहरातील वीज पुरवठा सातत्याने खंडित होत आहे. 

दिवसभरात किती वेळा वीजपुरवठा खंडित होईल हे सांगता येत नाही. बंद पडलेली वीज पुन्हा केव्हा येईल याचा सुद्धा अंदाज बांधता येत नाही अशी विचित्र स्थिती निर्माण झाली आहे. या संदर्भात महावितरणच्या कार्यालयात संपर्क साधला असता उन्हाळ्यामुळे विजेची मागणी वाढली असून अतिरिक्त वीज मागणीचा ताण वाढल्यामुळे यांत्रिक बिघाड होण्याचे प्रमाण वाढले आहे. आम्ही यावर तोडगा काढण्याचा सतत प्रयत्न करीत असलो तरी तांत्रिक बाबीसमोर आम्ही हतबल असल्याचे कार्यालयाने सांगितले.