Sun, Jun 07, 2020 14:35होमपेज › Marathwada › शिवसैनिकांच्या राजीनाम्यांनी उद्धव ठाकरेंचे स्वागत?

शिवसैनिकांच्या राजीनाम्यांनी उद्धव ठाकरेंचे स्वागत?

Published On: Apr 14 2019 12:21AM | Last Updated: Apr 14 2019 12:21AM
उस्मानाबाद : प्रतिनिधी

पाच वर्षे राजीनामे खिशात घेऊन फिरणार्‍या मंत्र्यांचा अनुभव असलेल्या शिवसेनेला उमरगा येथील नाराजी नाट्याचा फटका बसण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे लोकसभेच्या प्रचारासाठी रविवारी उस्मानाबादेत येत असतानाच्या पूर्वसंध्येला उमरगा येथील नाराज शिवसेना पदाधिकार्‍यांचे राजीनामे सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

खा. रवींद्र गायकवाड यांना उमेदवारी नाकारून शिवसेनेने यावेळी ओमप्रकाश राजेनिंबाळकरांना संधी दिली आहे. त्यामुळे उमरगा येथील गायकवाड समर्थक नाराज आहेत. उमरगा, लोहारा तालुका हा खा. गायकवाड यांचे होमपीच असल्याने तेथील बहुतांश पदाधिकारी अजूनही प्रचारासाठी बाहेर पडलेले नाहीत. ते शांतच असल्याचे चित्र आहे.

खा. गायकवाडही प्रचारात कुठेच नाहीत. त्यातच दोन दिवसांपूर्वी भाजपने विजय संकल्प मेळावा घेतला. उमेदवार राजेनिंबाळकरही जमेल त्या पद्धतीने उमरग्यात प्रचार करीत आहेत. नाराजीची बाब ‘मातोश्री’ पर्यंत गेली असली तरी तिकडूनही फारशी दखल घेतलेली नाही. त्यामुळेच प्रचाराला बोलावले जात नसल्याचे कारण पुढे करुन उमरगा तालुकाप्रमुख बाबुराव शहापुरे यांच्यासह सुधाकर पाटील, दीपक जोमदे, शेखर मुदकण्णा, मोहयोद्दीन सुलतान, शेखर पाटील या उपतालुकाप्रमुखांनी जिल्हाप्रमुखांकडे सामूहिक राजीनामापत्र दिले आहे. ते आज सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने शिवसेनेतील बेदिली उजेडात आली आहे.

राजीनामे आलेले नाहीत!

दरम्यान, जिल्हाप्रमुख कैलास पाटील यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी या पदाधिकार्‍यांचे राजीनामे मिळाले नसल्याचे सांगितले. खा. गायकवाड यांनी उमरगा-लोहारा तालुक्यातील कार्यकर्त्यांची बैठक घेऊन प्रचाराचे आदेश दिल्याचेही त्यांनी सांगितले.