Thu, Jun 04, 2020 23:02होमपेज › Marathwada › नगराध्यक्षपदाची निवडणूक दोन आठवड्यांत घ्या

नगराध्यक्षपदाची निवडणूक दोन आठवड्यांत घ्या

Published On: Nov 20 2018 1:00AM | Last Updated: Nov 19 2018 9:55PMशिरूर ः प्रतिनिधी 

येथील नगरपंचायतच्या नगराध्यक्षांवर आणलेल्या अविश्‍वास ठरावास न्यायालयाने स्थगिती दिली होती. ती स्थगिती सोमवारी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने उठवली आहे. तसेच दोन आठवड्यांत निवडणूक घेण्याचे आदेशही दिले.

शिरुर येथील नगरपंचायत राष्ट्रवादीच्या ताब्यात आहे. आ.सुरेश धस यांनी भाजपात प्रवेश केल्यानंतर येथील नगराध्यक्ष रोहिदास पाटील गाडेकर हे राष्ट्रवादीतच राहिले होते. यामुळे सुरेश धस यांना मोठा धक्का बसला होता. अडीच वर्षांचा कार्यकाल पूर्ण झाल्यानंतर रोहिदास पाटील गाडेकर यांनी पुन्हा राष्ट्रवादीचा झेंडा फ डकावला होता. परंतु यानंतरच्या काळात राष्ट्रवादीच्या दोन नगरसेवकांविरोधात न्यायालयात याचिका दाखल झाल्या. यातील एका नगरसेवकाचे पदही रद्द करण्यात आले होते. ही संधी साधत आ.धस गटाने नगराध्यक्षांवर अविश्‍वास ठराव दाखल केला होता. नगराध्यक्षपद धोक्यात आल्याने गाडेकर यांनी न्यायालयात धाव घेत स्थगिती आणली. ही स्थगिती उठवत ही निवडणूक प्रक्रिया पुढच्या दोन आठवड्यात घेण्याचे आदेश  उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपिठाने सोमवारी दिले आहेत.  या प्रकरणी अ‍ॅड.नितीन गवारे, अ‍ॅड.आशुतोष दुबे, अ‍ॅड.सुहास शिरसाठ यांनी काम पाहिले.    

धसांचे पारडे जड

या फेर निवडणुकीत आ.सुरेश धस यांचे 9 तर राष्ट्रवादीकडे 7 नगरसेवक आहेत. त्यामुळे धस गटाचे पारडे जड असल्याचे चित्र आहे. आता निवडणुकीची प्रक्रिया दोन आठवड्यात होणार असल्याने शिरूरमधील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. तर नगराध्यक्षपद कायम ठेवण्यासाठी रोहिदास गाडेकर हेही प्रयत्न करत आहेत.