Sun, Jun 07, 2020 15:55होमपेज › Marathwada › शेततळ्यांची हमी, अनुदानाची मात्रा कमी 

शेततळ्यांची हमी, अनुदानाची मात्रा कमी 

Published On: Aug 29 2018 1:42AM | Last Updated: Aug 28 2018 10:48PMगेवराई : प्रतिनिधी

मागेल त्याला शेततळे योजने अंतर्गत खोदलेल्या शेततळ्यांना तीन-चार महिन्यांचा कालावधी उलटूनही अद्यापपर्यंत शेतकर्‍यांना अनुदान मिळालेले नाही. त्यामुळे या योजनेत मागणी केल्यानंतर शेततळ्याची हमी शेतकर्‍यांना तत्काळ मिळत आहे, मात्र शेततळे खोदल्यानंतर शेतकर्‍यांना कृषी विभागाचे उंबरठे झिजवून देखील अनुदान मिळत नसल्याने या योजनेत अनुदानाची कमी असल्याचा प्रत्यय शेतकर्‍यांना येत आहे. परिणामी शेतकर्‍यांध्ये या योजनेविषयी नाराजी व्यक्त होत आहे.

सरकारने मागेल त्याला शेततळे ही योजना सुरू केली आहे. या योजनेत ऑनलाइन नोंदणी करून शेततळे खोदलेल्या शेतकर्‍यांना शेततळ्याच्या आकारमानानुसार व जास्तीत जास्त 50 हजार अनुदान तात्काळ देण्याची तरतूद आहे, मात्र सरकारच्या भरवशावर ऑनलाइन नोंदणी करीत शेततळे खोदलेल्या गेवराई तालुक्यातील 300 हून अधिक शेतकर्‍यांना तीन-चार महिन्यांनंतरही अनुदानासाठी पश्चाताप करण्याची पाळी आली आहे. शेतकर्‍यांना शेततळे खोदल्यानंतर अनुदान मिळणे आवश्यक आहे, मात्र कृषी विभागाचे उंबरठे झिजवूनही शेतकर्‍यांना अनुदान मिळत नाही. 

परिणामी शेतकर्‍यांनी शेततळे खोदाई करण्यासाठी काढलेले बँकेचे, उसणवारी, सावकाराचे कर्ज फेडायाचे कसे? असा प्रश्न शेतकर्‍यासमोर असून या कर्जाचा डोंगर वाढत असल्याचे एकंदरीत चित्र आहे, तसेच अनुदानासाठी विलंब होत असेल तर नव्याने शेतकरी या योजनेकडे पाठ फिरवितील यात तिळमात्र शंका नसेल असेही शेतकर्‍यांमधून बोलले जात आहे. अनुदान मिळाले नसल्यामुळे शेतकर्‍यांत नाराजी पसरली आहे.