Mon, Sep 16, 2019 12:28होमपेज › Marathwada › बियाणे वाटपात शेतकर्‍यांची चेष्टा

बियाणे वाटपात शेतकर्‍यांची चेष्टा

Published On: Jun 21 2018 1:24AM | Last Updated: Jun 20 2018 10:13PMपूर्णा : प्रतिनिधी

येथील महाराष्ट्र शासनाच्या तालुका कृषी कार्यालयांतर्गत शेकडो शेतकर्‍यांना ग्रामबिजोत्पादन कार्यक्रम योजनेतून अनुदानावर सोयाबीन बियाणे वाटप करण्यासाठी परमीट (परवाना) पावत्या  महाबीज अकोला महामंडळाचे परवानाधारक कृषी दुकानदार पारवे एजन्सी यांच्या नावे देण्यात आले आहेत. मागील आठ दिवसांपासून शेतकरी परवाना पावत्या घेऊन दुकानदारास बियाणे मागत आहेत, परंतु अनुदानावरील सोयाबीन बियाणे उपलब्ध नसल्याने शेतकर्‍यांना रिकाम्या हाताने परतावे लागत आहे.बियाणे उपलब्ध नसतानाही परमीट देऊन कृषी विभाग शेतकर्‍यांची चेष्टा करीत आहे.

शेतकरी दररोज दुकानावर चकरा मारत आहेत. दुकानदार महामंडळाकडेच बियाणे उपलब्ध नसल्याचे सांगत आहेत. ग्रामबिजोत्पादन कार्यक्रम योजनेअंतर्गत सोयाबीन बियाण्याची जे एस 335 या वाणाची 30 कि. ग्रॅ. वजनाची बॅग 1350 रुपये भरून घेऊन देण्याचा नियम आहे.शेतकरी पैसे घेऊन दुकानावर जात आहेत, पण तेथे बियाणेच उपलब्ध नसल्यामुळे शेतकरी नाराज होऊन कृषी खात्याच्या अधिकार्‍यावर संतप्त होत आहेत.या योजनेत परमिट दिलेल्या शेतकर्‍यांना कृषी खात्याच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनी तत्काळ बियाणे उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणी संबंधित शेतकर्‍यांतून जोर धरीत आहे.  या प्रकारामुळे शेतकर्‍यांमधून तीव्र नाराजी व्यक्‍त करण्यात येत आहे.