Sun, Aug 18, 2019 06:01होमपेज › Marathwada › रासायनिक बियाणांवर मात करण्यासाठी बियाणे बँक

रासायनिक बियाणांवर मात करण्यासाठी बियाणे बँक

Published On: Feb 13 2019 1:59AM | Last Updated: Feb 13 2019 1:59AM
बीड :  दिनेश गुळवे 

रायायनिक खते, बियाणे यांच्या वाढत्या वापराचे दुष्परिणाम समोर येऊ लागले आहेत. यामुळे आता पुन्हा गावरान धान्य, भाजीपाला यांना मागणी वाढली आहे. असे असताना हा गावरान बियाणांचा खजिना अबाधित राखला जावा, जपला जावा यासाठी शेतकर्‍यांनी आता बियाणे बँक सुरू केली आहे.

रासायनिक प्रक्रिया केलेली बियाणे, रासायनिक खतांचा वाढता वापर नि यापासून उत्पादन केलेल्या पदार्थांचा आहारात होणारा सर्रास उपयोग... यामुळे अनेक आजारांची भिती असल्याने आता सेंद्रिय शेती व गावरान धान्य, भाजीपाला याला पुन्हा अच्छे दिन येऊ लागले आहेत. असे असताना पारंपरिक पद्धतीचे गावरान बियाणे मिळणेही आता दुर्मिळ होऊ लागले आहे. त्यामुळे पिढ्यानपिढ्या जतन केलेला हा गावरान बियाणांचा खजिना ठिकून रहावा, यासाठी शेतकर्‍यांची पाऊले आता बियाणे बँककडे वळली जात आहेत. आहारात आजही गावरान पदार्थांसारखा कशातच गोडवा नसल्याचे सर्रास म्हटले जाते. त्यामुळेच गावरान बाजरी, गावरान ज्वारी यास मागणी वाढली आहे. तर, गहू, राळे, कारळी, तीळ असे पारंपरिक धान्य तर मिळणेच दुरापस्त झाले आहे. आहारात हायब्रिड धान्य, रासायनिक प्रक्रिया केलेले बियाणे व रासायनिक खतांचा वाढत्या वापराने तयार झालेले धान्य आल्याने अनेक आजारांना सामोरे जाण्याची वेळ येऊ लागली आहे. त्यामुळेच आहार तज्ज्ञांकडूनही गावरान धान्य, भाजीपाला खाण्याचा सल्ला दिला जातो. गेल्या काही दिवसांमध्ये सेंद्रिय शेतीपासून तयार केलेला भाजीपाला, धान्य यास उच्च व मध्यमवर्गीय ग्राहकांकडून मागणी वाढली आहे. या धान्यास दरही चांगला मिळू लागला आहे. असे असले तरी गावरान बियाणे मात्र उपलब्ध होत नाही, ही शेतकर्‍यांची करी अडचण आहे. ही अडचण ओळखून गावरान बियाणे मिळावे, त्यांचे संवर्धन केले जावे व गावरान धान्य, भाजीपाला खाण्यास मिळावे यासाठी धारूर तालुक्यातील जहांगिर मोहा येथील शेतकर्‍यांनी सेंद्रीय शेती योजने अंतर्गत जयकिसान सेंद्रिय शेती गटामार्फत बियाणे बँक सुरू केली आहे. कृषी विभागातील आत्माचे संचालक बी. एम. गायकवाड यांच्या संकल्पनेत ही बँक सुरू करण्यात आली आहे. 

बियाणे बँकेतून मोफत बियाणे

सेंद्रिय शेतीला बळकटी मिळावी, गावरान बियाणे टिकले जावे यासाठी शेतकर्‍यांना बियाणे बँकेतून मोफत बियाणे दिले जात आहे. असे असले तरी या बँकेतून शेतकर्‍यांनी पाच किलो बियाणे घेतल्यास नंतर मात्र या बँकेत उत्पादन झाल्यानंतर दहा किलो म्हणजे दुप्पट धान्य जमा करावे लागणार आहे. यातून या बँकेस बळकटी मिळणार आहे.