Sat, Jun 06, 2020 21:37होमपेज › Marathwada › वाळू, मुरूम, गिट्टी महागल्याने सर्वसामान्य नागरिक मेटाकुटीस

वाळू, मुरूम, गिट्टी महागल्याने सर्वसामान्य नागरिक मेटाकुटीस

Published On: Dec 25 2018 9:05AM | Last Updated: Dec 25 2018 2:05AM
परभणी : प्रतिनिधी

वाळू धक्का लिलावाबाबत परभणी जिल्हा प्रशासनाने आडमुठे धोरण अवलंबिल्याने जिल्ह्यातील पंधरा हजारापेक्षा अधिक कामगारांना फटका सहन करावा लागत आहे. यामुळे त्यांच्या कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ आली आहे. या सर्व बाबींचा आढावा घेऊन येत्या अधिवेनशात लक्षवेधी सूचनेच्या माध्यमातून प्रश्‍न उपस्थित करणार असल्याची माहिती आ.डॉ. राहुल पाटील यांनी दिली.

सद्यःस्थितीत बांधकामासाठी वाळू, मुरूम व गिट्टी यांचा तुटवडा आहे. त्यांचे भाव गगनाला भिडल्याने स्वत:च्या हक्काचे घर बांधणे सर्वसामान्यांसाठी केवळ स्वप्नच राहते कि काय असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. वाळूचे भाव 24 हजार रुपये प्रति ट्रक तसेच मुरुम व गिट्टी यांचा कृत्रिम तुटवडा भासवून अव्वाच्या सव्वा किंमतीत विक्री चालू असल्याने सर्वसामान्य नागरिक चिंतेत आहेत. याचाच परिणाम म्हणून घर बांधकाम प्रक्रिया ठप्प होण्याच्या मार्गावर आहे. 

वाळू, मुरुम व गिट्टी वेळेवर मिळत नसल्याने घरकुलांचे बाधकांमेही रखडली. बांधकाम व्यवसायात मोलमजुरी करुन उदरनिर्वाह करणार्‍या शहरी व ग्रामीण भागातील 15 हजारांवर कामगारांच्या कुटुंबीयांचा उदरनिर्वाहाचा प्रश्‍न पुढे आला आहे. वाळूचा प्रश्‍न अत्यंत बिकट आहे. एरवी 1200 रुपये ब्रास दराने मिळणारी वाळू आता 8 हजार रुपये ब्रास देऊनही मिळत नाही. चोरट्या मार्गाने वारेमाप पैसा देऊन ती विकत घ्यावी लागत आहे. यामुळे सर्वसामान्य नागरिक मेटाकुटीस आले आहेत. 

सर्वसामान्यांवर चौपट दर देण्याची वेळ

घरकूल बांधकामासाठी दहा हजार ब्रास वाळूची गरज असताना  केवळ 600 ब्रास वाळू प्रशासनाने उपलब्ध करून दिली. अजून 9 हजार 400 ब्रास वाळूची गरज आहे. याबाबत जिल्हा प्रशासनाने सकारात्मक पाऊल उचलले तरच लाभार्थ्यांना वाळू उपलब्ध होऊन त्यांचे घरकूल पूर्ण होऊ शकतात. वाळू धक्के, मुरूम घाट व दगडी खाणी यांचा लिलाव करण्याऐवेजी महसूल विभाग दंडात्मक कारवाई करून लिलावातून मिळणार्‍या रकमेपेक्षा अधिक पटीने जास्त रक्कम जमा करत आहे. परिणामी सामान्य माणसाला चौपट दराने वाळू, मुरूम व गिट्टी विकत घ्यावी लागत आहे.