Thu, Jun 04, 2020 22:28होमपेज › Marathwada › सावरगावात उभारतेय पाण्यावर तरंगणारी मूर्ती

भगवानबाबांच्या स्मारकाचे शुक्रवारी होणार भूमिपूजन

Published On: Aug 29 2018 1:42AM | Last Updated: Aug 28 2018 10:38PMपाटोदा : प्रतिनिधी

संत भगवानबाबा यांचे जन्मभूमी असलेल्या तालुक्यातील सावरगाव घाट येथे गतवर्षी झालेल्या दसरा मेळाव्यात पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी गावात संत भगवानबाबा यांची पाण्यावर तरंगणारी 25 फूट मूर्ती असलेले स्मारक उभारणार असल्याचे आश्‍वासन दिले होते. या स्मारकाच्या कामाचे भूमिपूजन 31 ऑगस्ट रोजी खासदार डॉ. प्रीतम मुंडे यांच्या हस्ते होणार आहे. या जागेची नुकतीच भाजप पदाधिकार्‍यांनी पाहणी केली.

गतवर्षी पालकमंत्री पंकजा मुंडे यांचा दसरा मेळावा सावरगावघाट येथे घेण्याचा निर्णय झाला. केवळ एका दिवसात तयारी करून राज्याचे लक्ष लागलेला हा दसरा मिळावा गर्दीचे सर्व विक्रम मोडणारा ठरला. याच मेळाव्यात पंकजा मुंडे यांनी सावरगावचा  कायापालट होणार असल्याचे सांगून भगवानबाबांचे जन्मस्थळ असलेल्या सावरगावात संत भगवान बाबांची ज्ञानेश्वरी वाचतानाची वैशिष्टपूर्ण अशी 25 फुटी मूर्ती  असलेले स्मारक उभारणार असल्याचा शब्द दिला होता. पालकमंत्री मुंडे यांनी हा शब्द पाळला असून या कामाचे भूमिपूजन 31 ऑगस्ट रोजी खासदार प्रीतम मुंडे यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी आमदार सुरेश धस, आमदार  भीमराव धोंडे, जिल्हा परिषद अध्यक्ष सविता गोल्हार, विजय गोल्हार आदी उपस्थित राहणार आहेत.

स्मारक उभारण्यात येणार असल्याच्या जागेची नुकतीच भाजप पदाधिकार्‍यांनी पाहणी केली. भूमिपूजन कार्यक्रमासाठी सरपंच राम सानप, ग्रामसेवक लक्ष्मण ढेपे, यांच्यासह ग्रामस्थ परिश्रम घेत आहेत. वारकरी सांप्रदायातील थोर संत भगवान बाबा यांची जन्मभूमी असलेले सावरगाव घाट हे गाव पाटोदा तालुक्यातील आटेगाव पुठ्ठा परिसरात वसलेले आहे. गतवर्षी पालकमंत्री पंकजा मुंडे यांचा दसरा मेळावा भगवानगडाऐवजी अचानक सावरगाव घाट येथे घेण्याचा निर्णय झायाने दुर्लक्षित असलेले गाव अचानक प्रकाश झोतात आहे. पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी दिलेला शब्द पाळल्याने सावरगाव घाट येथील ग्रामस्थांमध्ये समाधान व्यक्‍त होत आहे.