Thu, Jun 04, 2020 22:05होमपेज › Marathwada › औरंगाबादजवळ साईनगर एक्सप्रेस लूटली

औरंगाबादजवळ साईनगर एक्सप्रेस लूटली

Published On: Sep 21 2018 12:00AM | Last Updated: Sep 21 2018 12:03AMपूर्णा : प्रतिनिधी

शिर्डीहून काकीनाड्याला जाणारी साईनगर एक्सप्रेस गुरूवारी रात्री साडे आठच्या सुमारास अंकाई-नगरसोल मार्गावर लूटली. या गाडीवर दगडफेक करून एस 3, एस 8 या दोन डब्यात दरोडेखोरांनी चाळीस मिनिटे धुडगूस घातला. 

रात्री साडे सातवाजता ही रेल्वे (क्रमांक १७०२५) शिर्डी येथून निघाली. मनमाड येथे आठ वाजता आल्यानंतर वीस मिनिटांनी अंकाईच्या दिशेने निघाली. दहा मिनिटानंतर गाडीची साखळी ओढण्यात आली आणि जंगलात गाडी थांबली. अचानक साखळी ओढल्याने रेल्वे चालक व अन्य कर्मचारी खाली उतरले. तितक्यात चोरट्यांनी त्यांच्यावर दगडफेक सुरू केली. अचानक सुरू झालेल्या दगडफेकीमुळे खाली उतरलेले कर्मचारी भांबावले. चोरट्यांनी त्यांना धमकावले, तसेच प्रवाशांवर दगडफेक सुरू केली. त्यामुळे एकच गोंधळ उडाला. चाळीस मिनिटे हा धुमाकूळ सुरू होता. प्रवाशांची नेमकी कितीची लूट झाली, हे कळू शकले नाही. 

रात्री साडे नऊच्या सुमारास गाडी नगरसोल येथे आल्यानंतर प्रवाशांनी स्थानकावर एकच गोंधळ घातला. उपस्थित असणार्‍या टीसीला प्रवाशांनी घेराव घातला. परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात असल्याचे लक्षात आल्यानंतर रात्री स्थानिक पोलिसांना पाचारण करण्यात आले.

रेल्वे पोलिस गायब

नियमाप्रमाणे रेल्वेत रेल्वे पोलिस आवश्यक होते. हे पोलिस मनमाडहून अपेक्षित असताना ते औरंगाबादहून बसतात. त्यामुळे प्रवाशांना संकटाला सामोरे जावे लागले. पोलिस असते तर त्यांनी हवेत गोळीबार करून दरोडेखोरांना माघार घ्यायला लावली असती, असे एका प्रवाशाने सांगितले.