Sun, Jun 07, 2020 15:26होमपेज › Marathwada › साहेब, आमचा पाणीप्रश्‍न सोडवा

साहेब, आमचा पाणीप्रश्‍न सोडवा

Published On: May 15 2019 1:53AM | Last Updated: May 15 2019 1:38AM
हिंगोली : प्रतिनिधी 
यंदा पाण्याची लई आबाळ झाली साहेब, हंडाभर पाण्यासाठी रानोमाळ फिरावं लागतं, काहीही करा, पण लवकर पिण्याच्या पाण्याची सोय करून आमचा प्रश्‍न सोडवा, अशी विनवणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे जिल्ह्यातील 24 गावांच्या सरपंचांनी ऑडिओ ब्रिजद्वारे संवाद साधताना केली. 

दुष्काळाचा  आढावा घेण्यासाठी  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी जिल्हाभरातील सरपंचांशी संवाद साधला. सरपंचांशी बोलून देवेंद्र फडणवीस यांनी अडचणी जाणून घेतल्या. प्रशासनाकडून दोन दिवसांपूर्वीच जिल्ह्यातील सव्वापाचशे ग्रामपंचायतींचे सरपंच व ग्रामसेवकांना मंगळवारी ग्रामपंचायत कार्यालयात हजर राहून मुख्यमंत्र्यांशी संवाद साधण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार मंगळवारी सकाळी 9 वाजल्यापासूनच प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये सरपंच व ग्रामसेवक मुख्यमंत्री फडणवीस यांच्या दूरध्वनीची प्रतीक्षा करीत होते. 

जिल्ह्यातील कडती, दाताडा, तोंडापूर, केंद्रा बुद्रुक, कापडसिंगी, जांभरून बु., भंडारी बन, ब्रह्मवाडी, आजेगाव, लिंगदरी, पिंपळखुटा, हिवराबेल, हिंगणी, चोरजवळा, घोटा, खंडाळा, खेर्डा, धानोरा, केसापूर कोंढूर, झुंझुनवाडी येथील सरपंचांनी मुख्यमंत्र्यांशी संवाद साधून दुष्काळी परिस्थितीची जाणीव करून दिली. पिण्याच्या पाण्याबरोबरच हाताला काम देण्यासाठी उपाययोजना कराव्यात, अशी एकमुखी मागणी सरपंचांनी केली. 

उपाययोजनांबाबत निर्देश

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिल्ह्यातील सरपंचांशी संवाद साधून जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. एच. पी. तुम्मोड यांना तत्काळ तत्काळ आवश्यक त्या ठिकाणी टँकरने पाणीपुरवठा सुरू करावा, विहीर व बोअर अधिग्रहणाचे प्रस्ताव निकाली काढावेत, रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून कामे हाती घेण्यात यावीत, असे आदेश दिले. दुष्काळी परिस्थिती लक्षात घेत अधिकार्‍यांनी सतर्क रहावे, असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले.