Mon, Jun 01, 2020 17:54
    ब्रेकिंग    होमपेज › Marathwada › राफेल : पवारांचे घूमजाव चौकशी समितीची मागणी

राफेल : पवारांचे घूमजाव चौकशी समितीची मागणी

Published On: Oct 02 2018 1:17AM | Last Updated: Oct 01 2018 11:21PMबीड : प्रतिनिधी

डॉ. मनमोहन सिंग सरकारच्या काळात 650 कोटी रुपये किंमत असलेल्या राफेल विमानाची भाजप सरकारच्या काळात 1600 कोटी रुपये किंमत कशी झाली, असा सवाल करत चौकशी समिती नेमून केंद्रातील भाजप सरकारने पुराव्यानिशी स्पष्टीकरण द्यावे. विमान खरेदीची सर्वपक्षीय चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी केली. बीड येथे विजयी संकल्प सभेत ते बोलत होते.

राफेल विमान खरेदी कराराच्या मुद्द्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हेतूबद्दल शंका घेण्याचे काही कारण नाही, असे विधान अलीकडेच पवार यांनी केले होते. त्यांच्या या विधानानंतर पक्षाचे ज्येष्ठ नेते तारिक अन्वर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली होती. या विधानानंतर आता पवार यांनी  घूमजाव केल्याचे बोलले जात आहे.

बोफोर्स तोफ खरेदीवेळी विरोधकांनी सवाल उपस्थित केला. त्यावेळी तत्काळ चौकशी समिती आम्ही नेमली. विरोधकांनी केलेल्या आरोपांची चौकशी झाली. रातोरात राफेल विमानांची तिप्पट किंमत कशी झाली, असा प्रश्‍न आज लोकांच्या मनात उपस्थित झाला आहे. असा प्रश्‍न आणि शंका उपस्थित झाल्यानंतर केंद्र सरकारने त्याचे स्पष्टीकरण दिले पाहिजे. मात्र, मोदी सरकार सुरक्षेचा मुद्दा पुढे करून, चौकशीला समोर जाण्यास टाळाटाळ करत आहे. राफेलच्या माध्यमातून देशाची लूट झाल्याचा आरोप त्यांनी केला.

पंतप्रधानांवर टीका

लोकांना ‘मन की बात’ सांगणार्‍या मोदींना ‘जन की बात’ कधी ऐकू येणार? शेतकरी आत्महत्या, शेतीमालाचे भाव, कामगारांचे प्रश्‍न, महिलांचे प्रश्‍न यावर ‘मन की बात’मध्ये काहीच का नसते? असे प्रश्‍न उपस्थित करून पवार यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली.