होमपेज › Marathwada › पावसाची दडी; जमिनीत भेगा

पावसाची दडी; जमिनीत भेगा

Published On: Aug 10 2018 12:58AM | Last Updated: Aug 09 2018 9:52PMलिमला : प्रतिनिधी

महसूल मंडळातील गावे  पुन्हा दुष्काळाच्या गडद परछायेत सापडली  आहेत. गेल्या काही  दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने जमिनीत भेगा पडल्या असून आसमंतातील  काळ्या  ढगांमधून पावसाच्या पाण्याचा टिपूसही पडत नसल्याने भेगाळलेली जमीन अन् माना टाकलेली पिके शेतकर्‍यांची  चिंता वाढवत  आहेत. 

गतवर्षी नापिकी झाल्याने हातात कवडीचाही माल पडला नाही.  दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकर्‍यांची यावर्षी  परिस्थिती बेताची आहे. असे  असतानाही उद्याच्या भविष्यासाठी कर्जबाजारी होऊन बळीराजाने शेतीची कूस भरून काढत पिके  वाढवली. आता  काही दिवसात पिके येऊन  माप पदरात पडणार तोच पावसाने दडी मारल्याने  बहरात आलेली  पिके घोटभर पाण्यासाठी तरसून वाळून जाण्याच्या मार्गावर आहेत. 

लिमला भागात पावसाने खंडाचा मुक्काम वाढवल्याने बळीराजा चिंतेत सापडला आहे. परिसरामध्ये सध्या ढगाळ वातावरण निर्माण झाले असून सोसाट्याचे वारे वाहू लागले आहे. आसमंतात पांढर्‍या  ढगांच्या दाटीमधून  पावसाचे काळे ढग लुप्त झाले आहेत. तसेच   ढगाळ वातावरणामुळे वाचून काचून राहिलेल्या पिकांवर भरमसाठ रोगराई पडली आहे. दरम्यान  ऑगस्ट मध्ये भरपूर पाणी होईल. पीक भरभरून येईल अशी आशा  शेतकर्‍यांना होती. मात्र दमदार पाऊस तर झालाच नाही भर ऑगस्टमध्ये कडक उन्हाळा जाणवत आहे. दरम्यान उपलब्ध पाण्याच्या सहार्‍यावर शेतकरी सोयाबीन पीक वाचण्याची धडपड करताना दिसत आहेत.