Sat, Jun 06, 2020 23:28होमपेज › Marathwada › रेल्वेच्या नियोजनाचा अभाव; वेळापत्रक कोलमडले

रेल्वेच्या नियोजनाचा अभाव; वेळापत्रक कोलमडले

Published On: Apr 28 2018 1:44AM | Last Updated: Apr 27 2018 11:14PMपूर्णा : सतीश टाकळकर 

दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागांतर्गत नियोजनशून्य कारभारामुळे  पंधरा दिवसांपासून रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले आहे. उशिरा धावणार्‍या गाड्यांमुळे प्रवाशी वैतागले असून रेल्वे प्रशासनाविरोधात  तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

दक्षिण मध्य रेल्वेच्या कारभाराला प्रवाशी त्रासले असून पंधरा दिवसांपासून रेल्वेचे वेळापत्रक पूर्णपणे कोलमडले असताना त्याकडे लक्ष दिले जात नसल्याचे दिसून येत आहे. सुधारणा करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने पावले उचलण्याची गरज असताना मात्र तसे होताना दिसून येत नाही.त्याचा परिणाम दिसून येत आहे. हैदराबाद - परभणी ही गाडी तर सहा ते सात घंटे उशिराने धावत आहे.त्यामुळे नांदेडला जाणार्‍या प्रवाशांचे अतोनात  हाल होत आहेत. त्याचबरोबर हैदराबाद - औरंगाबाद ,काचिगुडा -मनमाड ,निजामाबाद- पंढरपूर, दौंड- नांदेड, पुणे - निजामाबाद,आदिलाबाद- परळी, परळी - अदिलाबाद, नगरसोल - नांदेड ,पूर्णा - अदिलाबाद या पॅसेंजर गाड्या नियमित उशिराने धावत आहेत. त्यामुळे प्रवाशांचे हाल होत असून अनेक गैरसोयींना तोंड द्यावे लागत आहे.

दुसरीकडे मालगाड्या तासन्तास रेल्वेस्थानकवर  एकाच जागेवर प्लॅटफार्म थांबविल्या जात असल्याने प्लॅटफार्म उपलब्ध नसल्या कारणाने   एक्सप्रेस व पॅसेंजर गाड्यांचे वेळापत्रकावर याचा थेट  परिणाम होतो. बुधवारी तर देवगिरीसह सर्व एक्सप्रेस व पॅसेजर तीन -चार तास उशीराने धावल्याने सर्व स्थानकांवर प्रवाशी ताटकळले होते.  पूर्णा -परभणी हे अंतर  केवळ अर्धा तासाचे असून   परभणी - मिरखेल लोहमार्गाचे दुहेरीकरण झालेले असताना एक ते दीड घंटे लागतात. मनमानी पध्दतीने गाडी तासन्तास थांबवली जाते तर परभणी स्थानकावरून मनमाड - काचिगुडा ,नगरसोल - नांदेड ह्या पॅसेंजर  परभणी स्थानकवर तासनतास उभ्या करुन दुपारी उशिराने सोडल्या जातात.

आता तर पंधरा दिवसांपासून  हैदराबाद - परभणी पुशपुल सकाळी दहा वाजता परभणी -  नांदेड जाणारी गाडीही दुपारी अशा या दोन्ही गाड्या पाठोपाठ धावत आहे.या प्रकारामुळे प्रवाशांना तासन्तास बसावे लागत असून मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. रेल्वे प्रशासनाने प्रवाशांची थट्टा चालवली असून या नियोजनशून्य अनागोंदी कारभाराविरुध्द प्रवासी वर्गात संताप व्यक्त केला जात आहे.