Tue, Nov 12, 2019 15:07



होमपेज › Marathwada › ९३ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या बोधचिन्हाचे प्रकाशन

९३ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या बोधचिन्हाचे प्रकाशन

Last Updated: Nov 08 2019 1:57AM

९३ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या बोधचिन्हाचे प्रकाशन करताना मान्यवर.



उस्मानाबाद : प्रतिनिधी 

उस्मानाबाद जिल्ह्लाला ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. येथे होत असलेले ९३ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सर्वांच्या सक्रिय सहभागातून यशस्वी करु या असा निर्धार जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंढे यांनी केला.

उस्मानाबाद येथे १०, ११, १२ जानेवारी २०२० रोजी होत असलेल्या ९३ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या बोधचिन्हाचे प्रकाशन गुरूवारी दि. ७ रोजी जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंढे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्या बोलत होत्या. जिल्हा पोलिस अधीक्षक राजतिलक रोशन, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संजय तुबाकले यांची प्रमुख उपस्थिती होती.
जिल्हाधिकारी मुंढे म्हणाल्या, उस्मानाबाद येथे होणारे संमेलन हे सर्वार्थाने वेगळे ठरणार आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातील पर्यटनस्थळे पाहण्याची संधी साहित्यिक, साहित्यप्रेमींना लाभणार आहे. त्यासाठी आवश्यक ते नियोजन संयोजक समितीने करावे. आवश्यक तेथे प्रशासनाचे सक्रिय योगदान राहील, असेही त्या म्हणाल्या.

जिल्हा पोलिस अधीक्षक राजतिलक रोशन म्हणाले, साहित्य संमेलनाच्या बोधचिन्हातून  ऐतिहासिक संदेश दिला असून, ते संस्मरणीय ठरणार आहे. संमेलनाच्या माध्यमातून उस्मानाबादचा ऐतिहासिक, सांस्कृतिक वारसा सर्वांसमोर येईल, असेही ते म्हणाले.

तत्पूर्वी मनोगतात संमेलनाचे स्वागताध्यक्ष नीतीन तावडे यांनी साहित्य संमेलन आयोजनाबाबत माहिती दिली. प्रास्ताविक संमेलनाचे प्रमुख कार्यवाह रवींद्र केसकर यांनी केले. सुत्रसंचालन दौलत निपाणीकर तर आभार प्रदर्शन प्राचार्य डॉ. अनार साळुंखे यांनी केले. कार्यक्रमास जिल्हा माहिती अधिकारी मनोज सानप, संमेलनाचे कोषाध्यक्ष माधव इंगळे, संमेलन कार्यकारिणी सदस्य कमलताई नलावडे, डॉ. अभय शहापूरकर, प्राचार्य डॉ. सुलभा देशमुख, राजेंद्र अत्रे, आशिष मोदाणी, बालाजी तांबे, मीना महामुनी, इलियास पीरजादे, युवराज नळे, शेषनाथ वाघ यांच्यासह शहर व परिसरातील साहित्यिक, साहित्यप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.