Fri, Jun 05, 2020 23:12होमपेज › Marathwada › पवारांच्या घरात गृहयुद्ध; पुतण्याकडून काकांची विकेट 

पवारांच्या घरात गृहयुद्ध; पुतण्याकडून काकांची विकेट 

Published On: Apr 02 2019 1:58AM | Last Updated: Apr 01 2019 10:52PM
नागपूर : प्रतिनिधी

शरद पवारांचे पुतणे अजित पवार राष्ट्रवादीवर वर्चस्व मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. पवारांच्या घरातच गृहयुद्ध सुरू आहे. आता अजित पवारांच्या हातून शरद पवार ‘हिट विकेट’ झाले आहेत, अशी तुफानी टोलेबाजी पंतप्रधान  नरेंद्र मोदी यांनी सोमवारी वर्धा येथील जाहीर सभेत पवार कुटुंबीयांवर केली.

शिवसेना-भारतीय जनता पक्ष युतीच्या विदर्भातील वर्धा, अमरावती, चंद्रपूर आणि चिमूर-गडचिरोली लोकसभा मतदार संघातील उमेदवारांच्या प्रचारासाठी विराट सभेत मोदी बोलत होते.

सिंचन, मुद्रांक, शिक्षणात घोटाळे केले : मोदी

महाराष्ट्रातल्या दुष्काळाकडे लक्ष वेधत, हा दुष्काळ म्हणजे निसर्गाची देणगी कमी आणि काँगे्रस-राष्ट्रवादीची देणगी जास्त असल्याची टीका मोदी यांनी केली. शरद पवार 10 वर्षे देशाचे कृषिमंत्री असतानाही शेतकर्‍यांच्या आत्महत्या का थांबवल्या नाहीत, असा सवाल त्यांनी केला. महाराष्ट्रातील काँगे्रस-राष्ट्रवादी आघाडी म्हणजे कुंभकर्णाची झोप होती, अशी टीका करीत, दोघेही सत्तेत सहा महिने झोपायचे, त्यातून एक जागा व्हायचा आणि पैसे खाऊन पुन्हा झोपायचा, असे सांगून या लोकांनी सिंचन, मुद्रांक, रस्ते निर्मिती, शिक्षण असा कोणताही विभाग सोडला नाही, असा आरोप मोदी यांनी दोन्ही काँग्रेसवर केला.

धरणातल्या पाण्यावरील अजित पवारांचे उत्तर ऐकवू का?

धरणातल्या पाण्याबद्दल विचारले असता, ‘अजित पवारांनी काय उत्तर दिले ते इथे ऐकवू का’, असे विचारताच उपस्थित नागरिकांनी ‘नको, नको’ म्हणून जोरदार आवाज दिला. याच पवार काका-पुतण्यांनी मावळमध्ये आंदोलन करणार्‍या शेतकर्‍यांवर गोळीबार करण्याचे आदेश दिले होते. याकडे लक्ष वेधत या विकासविरोधी आणि जनताविरोधी पक्षाला आणि नेत्यांना घरी पाठवण्याची वेळ आली आहे, असे मोदी यांनी यावेळी सांगितले.

काँग्रेस सरकारने हिंदूंना दहशतवादी ठरवून बदनाम केले : मोदी

काँगे्रस सरकारने हिंदूंना दहशतवादी ठरवीत बदनाम केले, असा आरोप पंतप्रधान मोदी यांनी केला. काँगे्रसचे तत्कालीन गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी हिंदू दहशतवाद हा शब्द वोट बँक पॉलिटिक्सकरिता वापरून पाच हजार वर्षांची हिंदुत्वाची परंपरा बदनाम केली, असा आरोप करीत, अशा काँगे्रसला तुम्ही निवडून देणार काय, असा सवाल त्यांनी यावेळी केला.

विरोधी पक्षाचे लोक मला शौचालयाचा चौकीदार म्हणून हिणवतात, याकडे लक्ष वेधत मोदी म्हणाले, मी शौचालयाचा चौकीदार हे पद अभिमानाने मिरवतो. यामुळे मी माझ्या आया-बहिणींच्या इज्जतीचा चौकीदार म्हणून ओळखला जाणार आहे, हा माझ्यासाठी गौरव आहे. स्वच्छतेचे काम करणार्‍यांना अशाप्रकारे हिणवून काँगे्रसवाले आचार्य विनोबा भावे आणि महात्मा गांधींचा अवमान करीत आहेत, त्यांना शिक्षा देणार ना, असा सवाल त्यांनी विचारला.

उरलेली काँग्रेस या निवडणुकीत संपवा : मुख्यमंत्री

2014 च्या निवडणुकीत मोदींनी वर्ध्यातूनच प्रचाराला सुरुवात केली होती. त्यामुळे गांधींजीचे स्वप्न म्हणजेच काँगे्रस संपवणे, हे वर्धावासीयांनी पूर्ण केले असे सांगून, या निवडणुकीत उरलीसुरली काँगे्रस संपवा, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केले.

वार्‍याची दिशा कळल्याने पवारांची माघार : मोदी

शरद पवार हे देशातले सर्वात अनुभवी नेते आहेत. ते कोणतेही काम विचारपूर्वक करतात. ते पंतप्रधान पदाचे स्वप्न बघत होते. मात्र, अचानक त्यांना एक दिवस साक्षात्कार झाला आणि त्यांनी राज्यसभा सदस्यत्वच चांगले असे का सांगितले, असा प्रश्‍न विचारीत त्यांनाही वार्‍याची दिशा कळते म्हणून त्यांनी माघार घेतली, असा टोला त्यांनी लगावला.