Sat, Jun 06, 2020 21:45होमपेज › Marathwada ›  ठाण्याच्‍या आवारात पोलिस कर्मचार्‍याचा आत्‍महत्‍येचा प्रयत्‍न

 ठाण्याच्‍या आवारात पोलिस कर्मचार्‍याचा आत्‍महत्‍येचा प्रयत्‍न

Published On: Jul 20 2019 2:11AM | Last Updated: Jul 20 2019 2:11AM
मुखेड : प्रतिनिधी 

येथील पोलिस ठाण्यातील एका कर्मचार्‍याने पोलिस ठाण्याच्या आवारातच विष पिल्‍याची घटना शुक्रवारी (दि. १९)  सकाळी साडेअकराच्या सुमारास घडली. त्यानंतर सदर कर्मचार्‍याला पुढील उपचारासाठी नांदेडला हलविण्यात आले आहे. उपविभागीय पोलिस अधिकारी यांच्या वागणुकीला कंटाळून पोलिस कर्मचार्‍याने  विष पिले असल्‍याचे बोलले जाते. 

मिळालेल्या माहितीनुसार, मुखेड पोलिस ठाण्यात वार्षिक तपासणी होती. यासाठी उपविभागीय पोलिस अधिकारी रमेश सरवदे हे आले होते. दरम्यान सकाळी तपासणीचे काम पूर्ण  झाल्यानंतर पोलिस कर्मचारी चंद्रकांत आंबेवार यांनी पोलिस ठाण्याच्या आवारात येऊन वरिष्ठ अधिकारी मला वेळोवेळी अपमानास्पद वागणूक देत असल्याचे सांगित गोंधळ निर्माण केला त्यानंतर सोबत आणलेले विष पिले.  

यावेळी उपस्थित असलेल्या कर्मचार्‍यांनी त्यांच्या हातातून विष  हिसकावले. परंतु, काही प्रमाणात विष कर्मचार्‍याच्या पोटात गेल्याने त्यांना उपचारासाठी तात्काळ उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले.   याठिकाणी प्राथमिक उपचार झाल्यानंतर त्यांना पुढील उपचारासाठी नांदेडला हलविण्यात आले आहे.