Sat, Jun 06, 2020 15:44होमपेज › Marathwada › गेवराईत अवैध दारू विक्रेत्यांवर पोलिसांची कारवाई

गेवराईत अवैध दारू विक्रेत्यांवर पोलिसांची कारवाई

Published On: Jun 22 2018 2:08AM | Last Updated: Jun 21 2018 10:52PMगेवराई : विनोद नरसाळे

तालुक्यात गेल्या काही दिवसांमध्ये दररोज लाखो रुपयांची अवैध दारू विक्री केली जाते. विशेषत: महामार्गालगतच्या बीअरबार बंद झाल्यानंतर या अवैध दारू विक्रीचे पेव फुटले आहे. शहरातील वाईन शॉप येथून धाबेचालक दारू घेऊन जातात व त्याची चढ्या दराने विक्री करतात. याची माहिती पोलिस अधीक्षक यांच्या विशेष पथकाला खबर्‍याने दिली. या पथकाने सापळा रचून टाटा सुमा व चालकाला ताब्यात घेतले. या कारवाईने अवैध दारू विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहे.

गेवराईतून एक टाटा सुमो (क्र-एम.एच.20 बी.टी.5401) ही गाडी अवैध दारू बॉक्स घेऊन चोरटी वाहतूक करत असल्याची माहिती खबर्‍यामार्फत विशेष पथकाला मिळाली. त्यानुसार पथकाने गेवराईतील जुन्या बसस्थानकालगत असलेल्या भगवती टॉकीजच्या बाजूला सकाळी 8.30 वा. सापळा रचला. अवैध चोरटी दारू वाहतूक करणार्‍या टाटा सुमोसह चालक किशोर आसाराम वादे (वय 25 वर्षे रा.सावतानगर, गेवराई) याला रंगेहाथ पकडून देशी दारू बॉक्स हस्तगत केले. दरम्यान टाटासुमोसह 22 देशी दारू बॉक्स असा दोन लाख 71 हजार 711 रु. ऐवढा मुद्देमाल जप्त करून आरोपी विरुद्ध गेवराई पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई पोलिस अधीक्षक जी. श्रीधर, उपअधीक्षक वैभव कलुबर्मे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाचे सहायक पोलिस निरीक्षक कैलास लहाने, पी. टी. चव्हाण, पी. सी. शिंदे, महेश चव्हाण, संजय चव्हाण, विजय पवार, उबे यांनी केली. 

गेवराईत खरेदी, तालुक्यात विक्री

राष्ट्रीय महामार्गावरील दारू दुकाने बंद केल्यानंतर तालुक्यात महामार्गालगत सुरू असलेल्या हॉटेल, धाब्यांवर अवैध दारू विक्री मोठ्या प्रमाणावर केली जात आहे. स्थानिक पोलिसांशी संपर्क ठेवून हे काम जोमात सुरू आहे. स्थानिक पोलिसांच्या नाकावर टिच्चून पोलिस अधीक्षक यांच्या विशेष पथकाने सातत्याने कारवाया केल्या आहेत. मात्र, यानंतरही स्थानिक पोलिस याकडे गांभीर्याने पाहत नाहीत. त्यामुळे अवैध दारू विक्रेते गेवाईत दारू खरेदी करतात व तालुक्यात बिनबोभाट विक्री करतात.