Sun, May 31, 2020 02:02होमपेज › Marathwada › फुटीरतावाद्यांसोबत उभे राहणे शोभते का?

फुटीरतावाद्यांसोबत उभे राहणे शोभते का?

Published On: Apr 09 2019 12:16PM | Last Updated: Apr 09 2019 1:25PM
औसा  : प्रतिनिधी

काँग्रेसच्या जाहीरनाम्यात राष्ट्रविरोधी अनेक मुद्दे असून, अशा लोकांसोबत शरदराव तुम्ही उभे आहात, हे तुम्हाला शोभते का? असा सवाल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी औसा येथे मंगळवारी महायुतीच्या जाहीर सभेत केला. दहशतवाद्यांचे समूळ उच्चाटन करण्याचे सरकारचे धोरण असून दोन पंतप्रधान हवेत असे म्हणणार्‍यांचे समर्थन पवारांकडून अपेक्षित नव्हते, असे ते म्हणाले.

लातूर जिल्ह्यात औसा येथे दुपारी झालेल्या सभेत मोदी यांनी काँग्रेस पक्ष, तसेच शरद पवार यांच्यावरही टीका केली. काँग्रेसने घोषित केलेल्या जाहीरनाम्यातील काही तरतुदी आणि पाकिस्तानची भाषा यात विलक्षण साम्य आहे. काँग्रेसने एअर स्ट्राइकचे पुरावे मागितले. जम्मू-काश्मीरला लागू असणारे 370 कलम हटविणार नाही, असे काँग्रेसने म्हटले आहे. 124 अ कलम रद्द करण्याचे आश्‍वासन काँग्रेसने दिले आहे. त्यामुळे राष्ट्रविरोधी कारवाया करणार्‍यांना मोकळे रान मिळणार आहे. ही बाब पाकिस्तानच्या पथ्यावर पडणारी आहे असे स्पष्ट करून मोदी म्हणाले, ज्यांना काश्मीरमध्ये वेगळा पंतप्रधान हवाय, त्यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आहेत. काँग्रेसकडून कोणतीही अपेक्षा केली जात नाही. पण, शरदराव तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती, अशा शब्दांत मोदी यांनी पवारांवर टीका केली. वोट बँकेसाठी काँग्रेसने देशहित धोक्यात घातल्याचा आरोप करत त्यांनी पाच वर्षांत राबवण्यात आलेल्या कल्याणकारी योजनांची उजळणी करून पुढील काळात करण्यात येणार्‍या विकास कामांचा संकल्प जनतेसमोर मांडला.21 व्या शतकात जन्मलेला नवमतदार प्रथमच लोकसभेसाठी मतदान करत आहे. कोणाच्याही जीवनातील पहिली गोष्ट अविस्मरणीय असते. त्यामुळे देशाचा विकास डोळ्यांसमोर ठेवावा आणि मतदान शहीद जवानांना समर्पित करण्यासाठी भाजपच्या पाठीशी उभे रहावे.

2014 मध्ये दिलेल्या अनेक आश्‍वासनांची पूर्तता झाली असून त्यातील काही बाबींची पूर्तता पुढील काळात करण्याचा आमचा संकल्प आहे. नक्षलवाद, माओवाद संपून आदिवासींना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. जम्मू-काश्मीरमध्ये स्थिती सामान्य होण्यासाठी देश मजबूत नेतृत्वाच्या हाती हवा आहे, असे त्यांनी सांगितले.भारतात अतिरेकी कारवाया करणार्‍या पाकिस्तानला चोख उत्तर देताना त्यांच्या घरात घुसून दहशतवाद्यांचा खात्मा केला, त्यावेळी त्याचा पुरावा मागणार्‍या पक्षाच्या उमेदवारांचे डिपॉझिट जप्त करण्याचे आवाहन मोदी यांनी केले. काँग्रेसच्या जाहीरनाम्यातील बाबी साठ वर्षांत पूर्ण झाल्या नाहीत. पुन्हा पुन्हा तेच मुद्दे घेऊन ते जनतेसमोर जात आहेत. आम्ही मात्र संकल्प पत्र सादर केले. ते दिवस-रात्र एक करून पूर्ण करणार आहोत, असे आश्‍वासन त्यांनी दिले.

जलशक्ती स्वतंत्र मंत्रालय 

महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांची भूमी आहे. महाराजांनी आपल्या काळात अतिशय प्रतिकूल परिस्थितीत पाण्याचे सूक्ष्मपणे नियोजन करून उत्कृष्ट व्यवस्थापन केले. त्यामुळे त्यांच्या कामाची दखल देशपातळीवर घेतली गेली. भविष्यात पाण्यासाठी युद्ध होण्याची शक्यता लक्षात घेता आगामी काळात भारत सरकार स्वतंत्रपणे जलशक्ती मंत्रालय सुरू करणार आहे. नदीजोड प्रकल्प राबवून घराघरांत आणि शेत शिवारात पाणी उपलब्ध करून देणार असल्याचेही त्यांनी सांगितले.