Sat, Jun 06, 2020 21:53होमपेज › Marathwada › प्रजासत्ताक दिनी परळीत प्रशासकीय इमारतीतील पुतळ्यावरून वादंग

अखेर 'त्या' नांगरधाऱ्याची पोलिसांत रवानगी

Published On: Jan 26 2019 2:03PM | Last Updated: Jan 26 2019 2:03PM
परळी वैजनाथ : प्रतिनिधी

परळीच्या मुख्य प्रशासकीय इमारतीत पूर्वी असलेला नांगरधारी शेतकऱ्याचा पुतळा काढून टाकण्यात आला होता. तो पुनर्स्थापित करावा यासाठी पुढाकार घेऊन स्वखर्चाने पुतळा तयार करून सुपूर्द करण्यासाठी आलेल्या नागरिकांना प्रशासनाने पुतळा स्वीकारण्यास नकार दिला. यावरून काही काळ वादंग निर्माण झाले होते. अखेर प्रशासकीय प्रक्रिया, महसूल की बांधकाम विभाग अशा एकंदरीतच लालफितीच्या कलगीतुर्‍यात प्रजासत्ताक दिनी या नांगरधारी शेतकऱ्याची पोलिसात रवानगी करण्यात आली.

 परळीतील मुख्य प्रशासकीय इमारत बांधकाम करताना प्रशासकीय इमारतीच्या परिसरात दर्शनी भागात नांगरधारी शेतकरी- कष्टकऱ्याचा पुतळा उभारण्यात आलेला होता. काही वर्षापूर्वी पुतळा खराब झाल्याने तो काढून टाकण्यात आला होता. रिकाम्या चबुतऱ्यावर शेतकऱ्याचा पुतळा पुन्हा बसवावा अशी गेल्या चार वर्षापासून सातत्याने सर्व स्तरातून मागणी होत होती. मात्र प्रशासकीय अडचणी व तांत्रिक मंजुरीची प्रक्रिया त्याचबरोबर पुतळा समिती व त्या अनुषंगाने असलेले निकष या सर्व लाल फितीच्या कारभारात हा पुतळा पुनर्स्थापित होत नव्हता. यादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने पुतळा तयार करून देण्यासाठी पुढाकार घेण्यात आला. तयार करण्यात आलेला पुतळा आज प्रजासत्ताक दिनी प्रशासनाला सुपूर्द करण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र अशाप्रकारे पुतळा स्वीकारता येत नसल्याची असमर्थता प्रशासनाने व्यक्त केली. 

तहसील प्रशासनाच्या वतीने पुतळ्या बाबतचा प्रस्ताव बांधकाम विभागाकडे देण्यात आलेला आहे. प्रशासकीय स्तरावर ही प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे पुतळा समितीच्या निर्णयानंतर या ठिकाणी पुतळा पुनर्स्थापित करण्याबाबत निर्णय होणार असल्याने हा देण्यात येणारा पुतळा आम्ही करू शकत नाही, असे तहसिलदार शरद झाडके यांनी सांगितले. तर महसूल प्रशासनाच्या अखत्यारीत हा परिसर येत असल्याने बांधकाम विभागाचा यात काही संबंध नसल्याचे बांधकाम विभागाचे उपकार्यकारी अभियंता काकड यांनी सांगितले.

दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी व सर्व पदाधिकारी यांनी हा पुतळा स्वीकारावा व प्रशासनाने पुन्हा उभा करावा अशी मागणी केली. 

या पुतळ्यावरून प्रजासत्ताक दिनाच्या ध्वजारोहणानंतर काही काळ वादंग निर्माण झाले होते. अखेरीस यामध्ये काहीच तोडगा न निघाल्यामुळे नांगरधारी शेतकऱ्याचा पुतळा पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आला. प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी शेतकरी- कष्टकर्‍याचे प्रतीक असलेल्या या पुतळ्याच्या नशिबी मात्र पोलिसात रवानगी होण्याची वेळ आली.