Thu, Jun 04, 2020 13:29होमपेज › Marathwada › नवीन वर्षात कपाशीचे दोन वाण बीटीमध्ये परिवर्तित होणार

नवीन वर्षात कपाशीचे दोन वाण बीटीमध्ये परिवर्तित होणार

Published On: Dec 28 2018 1:18AM | Last Updated: Dec 27 2018 10:43PM
परभणी : प्रतिनिधी

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ नवीन वर्षामध्ये कपाशीचे दोन वाण बीटीमध्ये परिवर्तित करण्यासाठी महाबीजशी सामजंस्य करार करणार असल्याची माहिती कुलगुरू डॉ. अशोक ढवण यांनी दिली.

वनामकृविच्या मध्यवर्ती प्रक्षेत्रावर घेण्यात आलेल्या कपाशीच्या नांदेड 44 बीटी वाणाचे प्रात्यक्षिक तसेच ज्वारीच्या परभणी शक्ती (पीव्हिके 1009) या वाणाचे बीजोत्पादन प्रात्यक्षिकाची पाहणी करण्यात आली. यावेळी कुलगुरू डॉ. ढवण यांनी माहिती दिली. या वेळी संशोधन संचालक डॉ. दत्तप्रसाद वासकर, ज्वार पैदासकार डॉ. शिवाजी म्हेत्रे,  डॉ.अंबिका मोरे मध्यवर्ती प्रक्षेत्राचे प्रभारी अधिकारी डॅा. विजय खर्गखराटे, जनसंपर्क अधिकारी डॉ.प्रवीण कापसे उपस्थित होते. मध्यवर्ती प्रक्षेत्रावर  35 एकरांत तर सायाळा शिवारात 15 एकरावर ज्वारीचे बिजोत्पादन घेण्यात आले आहे. 

कुलगुरू डॉ.ढवण म्हणाले की, वनामकृवि आणि पट्टणचेरू (हैदराबाद) स्थित आंतरराष्ट्रीय अर्धकोरडवाहू उष्णकटीबंधीय पीक संशोधन संस्था (इक्रिसॅट) यांच्यातर्फे विकसित ज्वारीच्या परभणी शक्ती (पीव्हिके 1009) या लोह आणि जस्ताचे प्रमाण जास्त असलेल्या पहिल्या जैवसमृद्ध (बायोफोर्टीफाईड) वाणांचे मध्यवर्ती प्रक्षेत्रावर 50 एकरवर बीजोत्पादन घेण्यात आले आहे. वनामकृविने आजपर्यंत विविध पिकांचे 141 वाण व 25 शेती औजारे विकसित केली असून 850 पेक्षा जास्त कृषि तंत्रज्ञान शिफारसी दिल्या आहेत. मराठवाडयातील शेतक-यांची अनेक दिवसांपासून मागणी असलेला कापसाचा नांदेड-44 हा वाण महाबीजच्या मदतीने बीटीमध्ये परावर्तीत करण्यात आला आहे. देशातील पहिला खरीप ज्वारीचा परभणी शक्ती जैवसमृध्द वाण विद्यापीठाने विकसित केला असून बाजरी पिकातील एएचबी-1200 व एएचबी-1269 हे जैवसमृध्द वाण निर्माण केले आहेत.