Sat, Jun 06, 2020 23:17होमपेज › Marathwada › परभणीचा डायलिसीस विभाग मराठवाड्यात आघाडीवर!

परभणीचा डायलिसीस विभाग मराठवाड्यात आघाडीवर!

Published On: Apr 29 2018 2:08AM | Last Updated: Apr 29 2018 1:46AMपरभणी : नरहरी चौधरी

येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात सध्या 4 मशीनद्वारे रुग्णांवर डायलिसीसचा उपचार करण्यात येत आहे. स्वच्छता, रुग्णांना वेळेवर सुविधा व इतर अन्य बाबींबाबत हा कक्ष मराठवाड्यात उपचारासाठी प्रथम असल्याचा दावा येथील कक्ष प्रमुख तथा किडनी तज्ज्ञ डॉ. बी. एस. नरवाडे यांनी केला आहे. 

हा कक्ष रुग्णांसाठी वातानुकूलित स्वरूपात कार्यरत करण्यात आलेला आहे. उपचारासाठी सध्या विभाग प्रमखासह अन्य दोन डॉक्टर व इतर कर्मचारी असे एकूण 10 कर्मचारी कार्यरत आहेत. या कक्षात परभणी शहर व ग्रामीण, माजलगाव, बीड, जिंतूर, सेलू, हिंगोली, माळसोन्ना, गंगाखेड, अंबाजोगाई यांसह अन्य ठिकाणांहून किडनी आजाराचे रुग्ण उपचारासाठी येतात. येथे रुग्णांची संपूर्ण माहिती नोंदवण्यात आलेली असून त्यांना भ्रमणध्वनीवरून कळवत उपचारासाठी बोलावण्यात येते. रुग्णांना वेळेवर कसा उपचार मिळेल याची खात्री कक्षातील कर्मचार्‍यांकडून घेतल्या जात असल्याने रुग्णांना मोठा दिलासा मिळत आहे.

जिल्हा रुग्णालयांतर्गत असणार्‍या हिंगोली, जालना, उस्मानाबाद या जिल्ह्यासह परभणी येथील डायलिसीस विभागात रुग्णांना मोठ्या प्रमाणात सुविधा पुरवल्या जातात. तसेच वैद्यकीय महाविद्यालय असलेल्या नांदेड व औरंगाबाद येथील डायलिसीस विभागापेक्षाही जास्त चांगल्या सुविधा येथे मिळत असल्याने हा कक्ष मराठवाड्यात उपचारात आघाडीवर असल्याचा दावा विभागप्रमुखांनी केला आहे. 

किडनी खराब होण्याची कारणे : पायावर सूज येणे, सकाळी-सकाळी चेहरा सुजणे, लघवीचे प्रमाण कमी होणे, दम लागणे, रक्ताचे प्रमाण कमी होणे, मधुमेह ज्या रुग्णांना आहे त्यांची रक्तातील साखर ही कधी कमी व जास्त होते अशांनाही हा आजार उद्भवण्याची दाट शक्यता असते. तसेच अनियंत्रित रक्तदाब, अनियंत्रित मधुमेह, दीर्घकाळ वेदनाशामक औषधी खाणे ही अत्यंत महत्त्वाची यातील किडनी खराब होण्याची कारणे असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. यासाठी तत्काळ अशा रुग्णांनी डॉक्टरांचा सल्ला घेऊन वेळीच उपचार घेणे आवश्यक आहे.

औरंगाबादला खाजगीत 4 डायलिसीससाठी 30 हजारांचा खर्च ः औरंगाबाद येथील एका खाजगी रुग्णालयात दोन महिन्यांपूर्वी डायलिसीससाठी गेलो होतो. तेथे डॉक्टरांनी माझ्याकडून 30 हजार रुपये घेद्वन केवळ 4 डायलिसीस उपचार केले. नंतर बीपीएल योजनेतून 8 वेळा उपचार केले. येथील खर्च परवडत नसल्याने सरकारी दवाखान्यात आलो. आता मला पूर्ण उपचार या कक्षात मोफत मिळत आहेत.  - शिवाजी देवराव काळे, डायलिसीस रुग्ण, परभणी.