Mon, Sep 16, 2019 11:48होमपेज › Marathwada › श्रेय घेण्याची हौस होती तर सत्तेवर असताना निधी का आणला नाही ?

श्रेय घेण्याची हौस होती तर सत्तेवर असताना निधी का आणला नाही ?

Published On: Feb 03 2019 1:15AM | Last Updated: Feb 02 2019 9:44PM
बीड : प्रतिनिधी

परळी मतदारसंघात विकासकामे करण्यासाठी सत्तेच्या माध्यमातून  आपण कोट्यवधी रुपयांचा निधी आणला. मात्र मी आणलेल्या कामांचे घाईघाईने उद्घाटन करण्याचा राष्ट्रवादी काँग्रेसचा आटापिटा सुरू आहे. श्रेय घेण्याची एवढी हौस होती, तर मागच्या वेळी सत्ता असताना निधी का आणता आला नाही, असा सवाल ना. पंकजा मुंडे यांनी राष्ट्रवादीवर टीका करताना केला.

मांडवा येथे राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेतून 96 लाख रुपये खर्चाच्या पाणीपुरवठा योजनांसह रस्ते, तीर्थक्षेत्र विकास व अन्य 7 कोटी 48 लाख रुपयांच्या विविध विकासकामांचा शुभारंभ त्यांच्या हस्ते झाला. त्यावेळी त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी आ. आर. टी. देशमुख उपस्थित होते.

ना. मुंडे म्हणाल्या की, लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांनी या भागाच्या विकासाचे स्वप्न पाहिले होते. खूप संघर्षातून ते सत्तेत आले, पण नियतीला ते मान्य नव्हते, त्यांचे अर्धवट राहिलेले स्वप्न मला पूर्ण करायचे आहे. मांडव्याची पाणीपुरवठा योजना करूनच गावात येईल, असा शब्द मी दिला होता, तो मी पूर्ण केला आहे. रस्ते, पाणी, वीज, शाळा खोल्या, ग्रामपंचायत कार्यालय, सभागृह सर्व काही दिले. जनतेच्या पायावर विकासाचा अभिषेक मला करायचा आहे.

राष्ट्रवादीवर हल्लाबोल

ना. पंकजा मुंडे यांनी आपल्या भाषणात राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या नाटकीपणाचा समाचार घेतला. लोकसभा निवडणुकीत कोणाला उभा करायचे, याबद्दल राष्ट्रवादीचे नेते अजूनही पेचात आहेत. भाषणात गप्पा ठोकणार्‍यांचेही उभा राहण्याचे धाडस होत नाही. उमेदवारीबद्दल विचारले की सांगतात, शरद पवारांनी आदेश दिला तर उभा राहू. अशावेळी पवारांची आठवण येते, मग तोडपाणीचे राजकारण करताना कशी त्यांची आठवण येत नाही, असा सवाल त्यांनी केला.